भारतीय नौदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारतीय विमानतळ प्राधिकरणाची विशेष बैठक
वास्कोः एमईएस चौक ते बोगमाळो चौक दरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या काही ठिकाणच्या उंची संदर्भात भारतीय नौदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सुवर्णमध्य साधणारा तोडगा काढल्याने या पुलाचे बांधकाम वेगाने सुरू झाले असल्याचे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.
या उड्डाण पुलाच्या १७ खांबांची उंची कमी करण्यात येणार असल्याने खर्चही कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पुलाबाबत तसेच दाबोळी विमानतळासंबंधी नकरात्मक अफवा पसविणाऱ्यांना त्यांनी 'एक तरी सकरात्मक गोष्ट करा', असा सल्ला दिला आहे.
या उड्डाण पुलाच्या खांबांची उंची अधिक असल्याने विमानांना उतरताना अडथळा होऊन एखादा अनर्थ घडू शकतो. यासाठी काहीजणांनी सदर पुलाच्या बांधकामासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंबंधी निकाल देताना न्यायालयाने यासंबंधी नौदलाकडून योग्य एनओसी घ्यावी असा आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिला होता. तसेच सदर एनओसी मिळेपर्यंत काम तात्पुरते बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते.
या आदेशानुसार भारतीय नौदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण इत्यादींची प्रतिनिधी, अधिकारी वर्गाची संयुक्त बैठक झाली. यासंबंधी योग्य व सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी नवी दिल्ली येथून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी खास गोव्यात आले होते.
बैठकीत चर्चेअंती तोडगा काढण्यात आला. या पुलाच्या काही खांबाची उंची कमी केल्यास समस्या दूर होऊ शकते असे स्पष्ट झाल्याने त्यासंबंधी सहमती दर्शविण्यात आली.
पुलामुळे अपघातावर नियंत्रण ठेवण्यास मदत
या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पुलावरून मुरगाव बंदरातील व इतर अवजड वाहने वाहतूक करतील. पुलाखालील रस्त्यावरून इतर वाहनांची वाहतूक सुरू असेल. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास तसेच अपघातावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.