पणजीत २०० रुपये प्रतिकिलो : लिंबू, नारळ, नीरफणसाचे दर चढेच
पणजी : बाजारात आवक कमी झाल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात वालपापडीचे दर ४० रुपयांनी वाढून २०० रुपये किलो झाले. पुढील काही दिवस वालपापडीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजारात लिंबाचा दर आकारानुसार ८ ते १० रुपये नग होता. मध्यम आकाराचा नारळ ५० रुपये, तर शहाळे ६० रुपयांना एक होते. नीरफणस आकारानुसार २०० ते ४०० रुपयाला एक होता.
गत आठवड्याच्या तुलनेत सोमवारी अन्य भाज्यांचे दर स्थिर होते. बाजारात मानकुराद आंबा आकारानुसार ५०० ते १००० रुपये डझन होता. हापूस आंबा ४०० ते ८०० रुपये डझन होता. बाजारात करवंद, जांभूळ ५० रुपयेला वाटा होता. चुन्ना ,ओले काजू अशा उन्हाळी रानमेव्याला मागणी कायम आहे. बाजारात टोमॅटो आणि कांदा ३० रुपये किलो, बटाटा ४० रुपये किलो होता. ढब्बू मिरची ८०, तर मिरची १०० रुपये किलो आहे.
बाजारात काकडीचे दर १० रुपयांनी वाढून ६० रुपये किलो झाले. गाजराचे दर २० रुपयांनी कमी होऊन ६० रुपये किलो झाले. भेंडी, दोडका ८० रुपये किलो होते. गवार आणि कारले प्रत्येकी ६० रुपये किलो होते. कोबीचा एक गड्डा ४० रुपये, तर फ्लॉवरचा दर ५० रुपये होता. आल्याचा दर १२० ते १४० रुपये किलो, तर लसूण आकारानुसार २०० ते ३०० रुपये किलो होता. स्वीट कॉर्न ५० रुपये ३ नग होते.
बाजारात मेथी २५ रुपये, शेपू २० रुपये, पालक १० रुपये, कांदा पात १० रुपये, तर तांबडी भाजी १० रुपये होती. कोथिंबीरची पेंडी २५ रुपयांना होती.
‘फलोत्पादन’च्या गाड्यांवर वालपापडी १३८ रुपये
सोमवारी फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर भेंडी २० रुपये, कोबी २० रुपये, गाजर ३२ रुपये, फ्लॉवर ३६ रुपये एक नग, वालपापडी १३८ रुपये, मिरची ५०, कांदा २५, बटाटा ३३, तर टोमॅटो २६ रुपये किलो होता.