कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
वास्को : सांकवाळ येथील शांतादुर्गा मंदिरासमोरच्या महामार्गावर रविवारी (११ रोजी) मध्यरात्री ३ वा. च्या सुमारास झालेल्या स्वयंअपघातात कारचालक अवधूत पांडुरंग जाधव (३०) हा तरुण ठार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा कोल्हापूरचा परंतू सध्या पर्वरी येथे राहणारा अवधूत जाधव हा रविवारी मध्यरात्री आपल्या स्कोडा रॅपिड कारने वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने जात होता. सांकवाळच्या शांतादुर्गा मंदिरासमोरच्या महामार्गावर पोहचल्यावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एका झाडावर आदळली. या अपघातात अवधूत हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच तेथे पोहचलेल्या १०८ रुग्णवाहिकेने त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तथापी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. याप्रकरणी निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.