
पेडणे : मधलामाज-मांद्रे येथील रस्त्यालगत असलेले शेकडो वर्षांचे जुनाट आंब्याचे झाड सोमवारी सायंकाळी अचानक कोसळले. या झाडाखाली सापडल्यामुळे दुचाकीस्वार विशाल कृष्णनाथ साळकर (रा. धुळेर, म्हापसा) या युवा सोनाराचा मृत्यू झाला. तर याच झाडाखाली एक कारही अडकली. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कारमधील चार प्रवासी किरकोळ जखमी होऊन बचावले.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास विशाल साळकर हे दुचाकीवरून हरमलमार्गे मांद्रेकडे जात होते. विरुद्ध दिशेने जीए ११ टी ५०३२ क्रमांकाची चारचाकी येत होती. दोन्ही वाहनांवर त्या क्षणी अचानक झाड कोसळले. विशाल साळकर झाडाखाली सापडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने स्थानिकांनी त्यांना तुये हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दुर्घटनेनंतर मदतीसाठी स्थानिक नागरिक, माजी सरपंच रोजा उर्फ मिंगेल फर्नांडिस, उपसरपंच संपदा आजगावकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, तसेच आमदार जीत आरोलकर यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्यात सक्रिय सहभागी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन झाड हटविले.
दररोज या ठिकाणी आंबे आणि मासे विक्रेत्या बसत असतात. मात्र, झाड कोसळले त्यावेळी कोणताही विक्रेता उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. काही नागरिकांनी सांगितले की, झाड दुपारीच कर-कर असा आवाज करीत होते. योग्य वेळी खबरदारी घेतली असती, तर ही दुर्घटना टळू शकली असती.
मांद्रे मतदारसंघातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांलगत मोठ्या प्रमाणात जुनाट, धोकादायक झाडे असून, पावसाळ्यात अशा झाडांच्या कोसळण्याची शक्यता वाढते. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून अशी झाडे तोडण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
झाडे कापण्यासाठी मालकांनी परवानगी द्यावी
आमदार जीत आरोलकर यांनी विशाल साळकर यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, मांद्रे मतदारसंघात स्वतंत्र अग्निशमन दल उभारण्यासाठी सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. मात्र झाडे कापण्यासाठी मालकांची परवानगी आवश्यक असते. फांद्या छाटण्यासाठी काही प्रमाणात मुभा आहे, पण संपूर्ण झाड कापण्यासाठी अधिकृत परवानगीची गरज भासते. अनेक वेळा परवानगीशिवाय झाड कापल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैलाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार
काणकोण : धुपेमळ-भाटपाल येथून चावडी येथे आपल्या दुचाकीने जाताना रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या बैलाने धडक दिल्याने ऐझीलो फर्नांडिस (५७, रा. धुपेमळ-भाटपाल) हे गंभीर जखमी झाले. त्यांना इस्पितळात नेत असताना वाटेत त्यांचे निधन झाले. फर्नांडिस हे तीन वर्षांपूर्वी दुबईहून आपल्या मुळ घरी आले होते ते आगोंद येथील एका रेस्टॉरंटमध्ये कामाला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

कारवरील झाड हटवताना अग्निशमन दलाचे जवान. (निवृत्ती शिरोडकर)