हवामान खात्याकडून वादळी वाऱ्याचाही अंदाज व्यक्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : हवामान खात्याने राज्यात १३ आणि १४ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या दोन दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. १५ आणि १६ मे रोजी किरकोळ पावसाची शक्यता आहे. सोमवारी पणजीत कमाल ३५.५ अंश, तर किमान २७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान २६.८ अंश सेल्सिअस राहिले. सोमवारी राज्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.
पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३५ अंश, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने राज्यात १७ ते १८ मे रोजी वातावरण कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात १ मार्च ते १२ मे दरम्यान सरासरी १३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण १८.१ टक्क्यांनी कमी आहे. १३ ते १६ मे दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहनही खात्याने केले आहे.
मान्सूनची आगेकूच
मान्सून मंगळवार, १३ मेपर्यंत अंदमान निकोबार येथील काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्र, संपूर्ण अंदमान निकोबार बेटावर दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.