पंतप्रधान मोदी : दहशतवाद कदापीही सहन करणार नाही !
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : भारताला अणूबॉम्बची भीती घालू नये. न्युक्लिअर ब्लॅकमेल आम्ही सहन करणार नाही, अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भारत भीक घालत नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिला. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ व युद्धाबाबत देशाची भूमिका स्पष्ट केली. यापुढे भारत कदापीही दहशतवाद सहन करणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी जगाला दिला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, पाकिस्तानला जगायचे असेल, तर त्याला दहशतवादी अड्ड्यांची सफाई करावीच लागेल. त्याशिवाय शांती प्रस्थापित होण्याचा कोणताही मार्ग नाही. भारताचे मत स्पष्ट आहे, दहशतवाद आणि संवाद एकत्रितपणे होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापार एकत्रितपणे चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही. पाकिस्तानसोबत चर्चा होईल, तर ती दहशतवादावरच होईल, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.
दहशतवाद्यांना पोसणारे भारताला ‘न्युक्लिअर ब्लॅकमेल’ करत आहेत. हे कदापी सहन केले जाणार नाही. या ब्लॅकमेलच्या आडून चालणाऱ्या दहशतवादावर भारत निर्णायक वार करेल. दहशतवाद पोसणारे सरकार व दहशतवादी म्होरके यांना वेगळे समजणार नाही. त्यांना एकाच तराजूत तोलले जाईल. यापुढे होणाऱ्या दहशतवादी कारवायांना थेट पाकिस्तानलाच जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. मोदी यांनी भाषणात सैन्यदलाचे आभार मानले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ स्थगित कले आहे थांबवलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
आता पाकव्याप्त काश्मीरच चर्चा होईल
पाकिस्तानसोबत आता फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल. भगवान बुद्धाने आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. शांततेचा मार्गसुद्धा शक्तीने होतो. भारताचे शक्तिशाली होणे गरजेचे आहे. गरज पडल्यावर त्या शक्तीचा वापर करणेही आवश्यक आहे. मागील काही दिवसांत भारताने तेच केले आहे, असे मोदी म्हणाले.
कुंकू पुसण्याचा परिणाम दहशतवाद्यांना कळला
पंतप्रधान मोदी म्हणाले, या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक राजकीय पक्ष एका सूरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी उभा राहिला. आम्ही दहशततवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारताच्या सैन्याला स्वातंत्र्य दिले. आज प्रत्येक दहशतवादी, दहशतवादी संघटनेला कळले आहे की, आपल्या माता-भगिनी आणि मुलींच्या कपाळावरचे कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो.
सांबा सेक्टरमध्ये दिसले पाकिस्तानी ड्रोन
जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सोमवारी रात्री पाकिस्तानी ड्रोन दिसले; परंतु अगदी कमी प्रमाणात हे ड्रोन असल्याने यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
अमृतसरमध्ये ब्लॅकआऊट
सोमवारी रात्री अमृतसरमध्ये ब्लॅकाऊट करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केले की, तुम्हाला सायरन ऐकू येईल. आम्ही सतर्क आहोत आणि ब्लॅकआउट सुरू करत आहोत. कृपया, तुमच्या घरातील दिवे बंद करा आणि खिडक्यांपासून दूर राहा. शांत राहा, वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याबाबत आम्ही लवकरच कळवू. घाबरू नका. खबरदारीचा उपाय म्हणून केलेली ही कार्यवाही आहे.
भारत, पाकिस्तान डीजीएमओ यांच्यात चर्चा
भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालन महासंचालक (डीजीएमओ) यांच्या दरम्यान सोमवारी सायं. ५ वा. चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर एकही गोळी न झाडणे किंवा कोणतीही आक्रमक किंवा शत्रुत्वाची कृती न करण्याच्या प्रतिबद्धतेच्या पालनासंबंधी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय, दोन्ही बाजूंनी सीमारेषा आणि पुढील भागांमधून सैन्य कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे मान्य केले, अशी माहिती भारतीय लष्करातील अधिकाऱ्याने दिली आहे.