मुख्यमंत्र्यांची घोषणा : डिचोलीत प्रशासकीय इमारतीची पायाभरणी
प्रशाससकीय संकुलाच्या शिलान्यासाचे अनावरण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट व इतर.
..
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : राज्य सरकार जलद गतीने प्रशासन जनतेच्या दारापर्यंत नेत असताना अनेक नव्या सुधारणा करण्यात येत असून २१२हून अधिक सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. कूळ-मुडकांरांचे खटले जलद गतीने निकालात काढण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. कोमुनिदाद, अल्वारा जमिनीतील घरे कायदेशीर करता यावीत यासाठी सरकार विशेष कायदा करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
डिचोली येथे सुमारे ६० कोटी रुपये खर्च करून साकारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत, तसेच नियोजित ६०० खुर्च्यांचे सुसज्ज ‘कला भवन’ची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, जिल्हाधिकारी यशस्वीनी बी., गोवा साधन सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिश हडकोणकर, उपजिल्हाधिकारी नेहाल तळवणेकर, जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर व इतर उपस्थित होते.
नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेला उत्तम सुविधा प्राप्त होताना एकाच छताखाली सर्व सरकारी कार्यालये येतील. मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प गरजेचा असून त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. डिचोलीत मास्टर प्लानची निर्मिती करणे गरजेचे असून त्याला अनुसरून विकासाला चालना देण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
डिचोलीचा हा प्रकल्प इंटिग्रेटेड स्वरूपाचा आहे. डिचोली व मये मतदारसंघांतील लोकांना येथे चांगली सोय उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालये भाडेपट्टीवर असून या इमारतीनंतर सर्व कार्यालय सरकारच्या जागेत स्थलांतरित होतील. मामलेदार कार्यालयात मुंडकरांचे खटले घेऊन येताना तिथे वकील आणू नयेत. अधिकाऱ्यांनीच हा विषय सोडवावा, अशी व्यवस्था करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले, अनेक वर्षाची मागणी साकारत असल्याबद्दल आनंद होत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे बहुमूल्य सहकार्य लाभल्यानेच अतिशय सुंदर प्रकल्प दोन वर्षात साकारणार आहे. आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, ‘कला भवन’ची अनेक वर्षांची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. नवीन संकुलात एका छताखाली येणारी प्रशासकीय कार्यालये यामुळे लोकांची चांगली सोय होणार आहे. जिल्हाधिकारी यशस्वीनी बी. यांनी स्वागत केले. उपजिल्हाधिकारी तळवणकर यांनी आभार मानले.
आमच्या सैन्याची कामगिरी लाजवाब !
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे बळी गेले. त्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानात घुसून त्यांना चारीमुंड्या चीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सैन्याची कामगिरी लाजवाब असून सर्व सैनिकांना सलाम ! या कारवाईत पाच सैनिक हुतात्मा झाले. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली ! भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत असून दहशतवाद्यांना ठेचून काढण्यासाठी कुठेच कमी पडलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.