डॉ. कल्पना महात्मे यांची माहिती : आरोग्य खात्यातर्फे विशेष स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील काही कुळागरांत डासांची उत्पत्ती होऊन तिथे काही जणांना डेंग्यूची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्यातर्फे कृषी अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना कुळागरांची तपासणी करण्यास सांगितली आहे. याशिवाय खात्यातर्फे स्वच्छ कुळागर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे कुळागरांचे मालक आपापल्या परिसराची स्वच्छता करतील, अशी अपेक्षा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूचे रुग्ण तिपटीने कमी झाल्याचे राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.
राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. कुळागरात पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. अशावेळी येथील परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असते. याशिवाय खात्यातर्फे मागील वर्षीच्या हॉटस्पॉट ठिकाणी स्वच्छता, औषध फवारणी, डासांची वस्ती नष्ट करणे अादी विविध कामे सुरू आहेत. राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२४ च्या तुलनेत २०२५ च्या चार महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तिपटीहून अधिक कमी झाली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२४ मध्ये राज्यात डेंग्यूचे ९५ रुग्ण आढळले होते. तर २०२५ मध्ये याच चार महिन्यात डेंग्यूचे २९ रुग्ण आढळले आहेत.
२०२५ मध्ये जानेवारीत ७, फेब्रुवारीमध्ये ९, मार्चमध्ये ७, तर एप्रिलमध्ये ६ रुग्ण आढळले होते. एप्रिलमधील सर्व ६ रुग्ण उत्तर गोव्यातील होते. यामध्ये म्हापसामध्ये २, हळदोणे, पेडणे, कांदोळी आणि शिवोली येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला होता. खात्यातर्फे स्थलांतरीत कामगार वस्तीमधील किंवा बांधकाम प्रकल्पात राहणाऱ्या कामगारांच्या परिसरात तपासणी केली जात आहे. पाणी साचू न देणे, साठवलेले पाणी झाकून ठेवणे, परिसर वेळोवेळी स्वच्छ करणे अशा किमान गोष्टी केल्यास डेंग्यूचे रुग्ण आणखी कमी होतील, असे डॉ. महात्मे यांनी स्पष्ट केले.