केंद्रीय वीजमंत्र्यांसोबत बैठकीत प्रस्तावावर चर्चा
केंद्रीय वीजमंत्री मनाेहरलाल खट्टर यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत केंद्रीय वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री सुदिन ढवळीकर आणि विश्वजीत राणे.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्याचा विचार आहे. गोव्यात आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प स्थापन करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. शक्यता (फिजिबिलिटी) अहवाल तयार झाल्यानंतर राज्याकडून योग्य प्रस्ताव येणे गरजेचे आहे, असे केंद्रीय वीज आणि गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले.
केंद्रीय वीज आणि गृहनिर्माण मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वीज आणि गृहनिर्माण क्षेत्रातील विकासाबाबत बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय वीज राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे व अधिकारी उपस्थित होते. विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी वीजनिर्मितीच्या विविध प्रकल्पांवर चर्चा सुरू आहे. देशात सध्या ८ गीगावॅट आण्विक वीजनिर्मिती केली जात आहे. २०४७ पर्यंत १०० गीगावॅट आण्विक वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. गोव्यात आण्विक वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याविषयी चर्चा झाली, असे केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बैठकीनंतर सांगितले. गोवा ८० टक्क्यांहून अधिक वीज बाहेरून विकत घेतो. वीज निर्मितीचे विविध मार्ग आहेत, त्यांचा गोव्याने विचार केला पाहिजे.
अन्य राज्यांच्या तुलनेत ग्राहकांना वीज पुरवठा चांगल्या पद्धतीने करण्यात गोवा आघाडीवर आहे. वीज क्षेत्रात गोव्याची कामगिरी उत्तम आहे. गोव्यात विजेच्या गळतीचे प्रमाण (एटी अँड सी लॉस) राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी, फक्त ९.३२ टक्के आहे. आरडीएसएस योजनेखाली मूलभूत सुविधा तयार करण्याचा गोवा अव्वल आहे. स्मार्ट मीटर बसवण्यात गोवा पिछाडीवर असले तरी आता निविदा जारी झाले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होणार आहे.
राज्याला ५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी करपाक केंद्र सरकार मदत करणार आहे. सौर ऊर्जेसाठी सोलर टॉप बसवण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देते. २०२६-२७ पर्यंत राज्यात २२ हजार सोलर टॉप बसवून पूर्ण केले जातील, असेही केंद्रीय मंत्री मनोहरलाला खट्टर म्हणाले.
वीजनिर्मितीसाठी प्रकल्प, तंत्रज्ञानाचा विचार : मुख्यमंत्री
राज्यात ९९ मेगावॅट सौर ऊर्जानिर्मिती होते. वीजनिर्मितीसाठी नवे तंत्रज्ञान, तसेच प्रकल्प स्थापन करण्याचा सरकार विचार करणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.