‘टीटीएजी’चा दावा : स्थिती निवळल्याने पर्यटक येण्याची आशा
पणजी : भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थितीची झळ गोव्याच्या पर्यटनाला बसली आहे. या भयावह स्थितीमुळे हॉटेलांचे बुकिंग रद्द झाल्याने राज्यातील पर्यटन मोठ्या प्रमाणात थंडावले आहे. पण येत्या काही दिवसांत ही स्थिती पूर्ववत होईल, अशी आशा पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
या विषयीची माहिती देताना टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा (Jack Sukhija) यांनी सांगितले की, युद्ध स्थितीमुळे राज्यात हॉटेलांची ऑक्युपन्सी २० टक्क्यांनी कमी होऊन ४० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. ऐनवेळी पर्यटकांनी आपले बेत रद्द केल्यामुळे त्याची झळ रिसॉर्ट, हॉटेल्स आणि टूर आयोजकांना बसली आहे.
देशातील बहुतेक विमानतळ युद्ध स्थितीमुळे बंद होते, पण गोव्यात येणारा विमान प्रवास स्थिर होता. फक्त चंदिगडहून येणारी विमाने बंद होती. गोव्यात येणारी सर्व विमाने नेहमीप्रमाणे सुरू होती. देशात जे विमानतळ बंद ठेवले होते, त्याचा परिणाम गोव्यावर जास्त झालेला नाही. फक्त चंदिगड विमानतळ वगळता इतर बंद ठेवलेल्या विमानतळांवरून गोव्याला थेट कनेक्टिव्हिटी नाही, असे स्पष्टीकरण सुखिजा यांनी दिले.
परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा व्यक्त करून सुखिजा यांनी सांगितले की, आम्हाला परिस्थितीत सुधारणा होत असल्याची चिन्हे दिसत आहेत आणि पुढील आठवड्यापर्यंत पर्यटकांचे गोव्यात आगमन वाढण्याची शक्यता आहे. पर्यटन भागधारक या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि येत्या आठवड्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन परिस्थिती स्थिर होईल, अशी आम्हाला आशा आहे.
‘रेंट अ कॅबला’ही झळ
या आठवड्याच्या शनिवार-रविवारी पर्यटकांची गर्दी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर पहायला मिळणार आहे. पण युद्धाच्या परिस्थितीमुळे सध्या सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ओस पडली आहेत. बहुतेक पर्यटक शेजारील राज्यांतून आपली वाहने घेऊन गोव्यात येतात, पण रेल्वे आणि विमानांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप कमी झाली आहे. सध्या सर्व टॅक्सी आणि रेंट अ कॅबला ग्राहक मिळत नसल्याने ती वाहने रस्त्यांच्या कडेला उभी केलेल्या आढळून येत आहेत.