दिव्यांगांना उपकरणे देण्यासाठी राज्यात खास शिबिरांचे आयोजन

दिव्यांग सशक्तीकरण मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
दिव्यांगांना उपकरणे देण्यासाठी राज्यात खास शिबिरांचे आयोजन

पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री सुभाष फळदेसाई. सोबत इतर

पणजी :
दिव्यांग सशक्तीकरण खात्यातर्फे स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा भाग म्हणून दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत. २० मे ते २ जून दरम्यान गोवाभर होणाऱ्या या शिबिरात दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेल्या सुविधा आणि यंत्रणा दिली जाणार आहे, अशी माहिती दिव्यांग सशक्तीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई (Subhash Phal Desai) यांनी दिली.
सचिवालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री फळदेसाई बोलत होते. यावेळी नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना, गोवा दिव्यांग हक्क आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावस्कर, सचिव ताहा हाजिक, दिव्यांग खात्याच्या संचालक वर्षा नाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, दिव्यांग सशक्तीकरण खाते, राज्य दिव्यांग आयुक्तांचे कार्यालय आणि नियोजन आणि सांख्यिकी खाते तसेच आलिमको या कृत्रिम हात पाय तयार करणारी सरकारमान्य कंपनीच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी विश्लेषण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
ही विश्लेषण शिबिरे गोव्याच्या सर्व तालुक्यांत २० मे ते २ जून दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत घेतली जातील. या शिबिरात स्वयंपूर्ण गोवा २.० खाली एडीआयपी योजने अंतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींसाठी गरजेची उपकरणे, सुविधा आणि यंत्रे दिली जाणार आहेत.
संपूर्ण गोव्यातून आम्ही ११,८०० दिव्यांग व्यक्तींचा शोध घेतला असून या शिबिरात सहभागी होण्यासाठी त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधला जाणार आहे, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
आम्ही प्रत्येक तालुक्यात दिव्यांग व्यक्तींसाठी शिबिरात येण्यासाठी सोय करणार आहोत. त्यांचे विश्लेषण केल्यानंतर त्यांना कसले अंपगत्व आहे, हे निश्चित केले जाईल आणि ३० दिवसांच्या आत त्यांना उपकरणे आणि यंत्रे दिली जाणार आहेत. यात मॅन्युअल आणि इलेक्ट्रॉनिक विविध प्रकारच्या व्हिलचेअर, हाताने चालवता येणारी तसेच बॅटरीवरील तीनचाकी सायकल, कॅलिपर आणि कृत्रिम हात पाय, श्रवण यंत्र, लेप्रोसी किट, लेप्रोसी रुग्णांसाठी फोन, दृष्टिहीन व्यक्तींसाठी रीडिंग सॉफ्टवेअर असलेल्या स्मार्टफोनचाही समावेश आहे, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

या आहेत अटी...

ही सुविधा घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीचे ४० टक्क्यांपर्यंत अपंगत्व असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्र सक्ती आहे. तसेच त्याचे महिन्याचे उत्पन्न २२,५०० रुपयांपर्यंत असायला हवे. तसेच मागील तीन वर्षात ज्या दिव्यांग व्यक्तींनी या उपकरणांचा लाभ घेतला आहे ते या योजनेस पात्र ठरणार नाहीत. पण, जर त्यांच्या उपकरणात बिघाड झालेला असेल तर त्यावर फेरविचार केला जाईल, अशी माहिती फळदेसाई यानी दिली. इच्छुकांनी वैध उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड आणि निवासी पत्त्याच्या कागदपत्रांसह शिबिरात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ०८३२-२९१२६०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंत्री फळदेसाई यांनी केले आहे.

हेही वाचा