२४ तास पाणी पुरवठ्यासाठी राज्याची ६५२ कोटींची योजना

अर्थिक मदतीची केंद्र सरकारची तयारी : सांडपाणी प्रकल्पांनाही मदतीचा हात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th May, 11:58 pm
२४ तास पाणी पुरवठ्यासाठी राज्याची ६५२ कोटींची योजना

बैठकीला उपस्थितकेंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे व इतर.

पणजी : राज्यात २४ तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजनेसाठी ६५२ कोटी रुपये खर्च येणार आहे. गोवा सरकारने तशी योजना तयार केली असून या योजनेला केंद्र सरकार अर्थिक मदत देणार आहे, असे केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण मंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांची पर्वरीतील मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik), नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे (Vishwajit Rane) उपस्थित होते. मूलभूत सुविधा आणि शहर विकास योजनेवर बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटी मिशन, दीनदयाळ अंत्योदय योजना यांच्या कार्यवाहीवर यावेळी चर्चा झाली.

राज्यात २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी सरकारने योजना तयार केली आहे. या योजनेवर ६५२ कोटी रुपये खर्च होणार आहे. या योजनेसाठी गोव्याने केंद्र सरकारकडे अर्थिक मदत मागितली आहे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी आणखी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. स्वच्छ भारत योजनेखाली गोव्याला ११३ कोटीपर्यंत अर्थिक मदत मिळणार आहे. मडगाव, फोंडा आणि साखळी येथे सांडपाण्याचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यासाठी अर्थिक मदत देण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असे खट्टर यांनी सांगितले.

‘अमृत’ योजनेखाली निधीची मागणी
गोवा हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. विकासाला गती देण्यासह लोकांचे जीवन सोपे आणि स्वच्छ करण्यावर बैठकीत चर्चा झाली. अमृत योजनेखाली सार्वजनिक शौचालये, एसटीपी प्रकल्प, नवीन नळजोडण्या यासाठी आवश्यक त्या प्रमाणात राज्याला निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत केली.

हेही वाचा