डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय घेण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला. व्यापार बंद करण्याची धमकी देऊन दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यास भाग पाडल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ‘जर युद्धविराम केला नाही, तर व्यापार बंद करू, असे आम्ही बजावले. त्यामुळे दोन्ही देशांनी लगेच त्यांची अट मानली आणि शस्त्रसंधी केली’ असा दावा ट्रम्प यांनी केला. या दोन्ही देशामध्ये तणाव कमी झाल्यामुळे अणुयुद्धाचा धोका टळला आणि कोट्यवधी लोकांचा जीव वाचला असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
‘आम्ही भारत आणि पाकिस्तानला सांगितले होते की जर संघर्ष थांबला नाही तर आम्ही व्यापार करणार नाही. शनिवारी, माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये तत्काळ युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली, मला वाटते की ही कायमस्वरूपी युद्धबंदी असेल, असे ट्रम्प म्हणाले’.
याआधीही ट्रम्प यांच्या दाव्यांमुळे ते अडचणीत आले होते. त्यांनी यापूर्वी असा दावा केला होता की, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम झाला. त्यांनी सर्वप्रथम ही घोषणा केली की, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. त्यानंतर लगेच पाकिस्तानने या गोष्टीला दुजोरा दिला.
अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रूबियो यांनी तर दोन्ही देश तटस्थ ठिकाणी भेटून विवादांवर चर्चा करतील, असाही दावा केला होता. मात्र, भारताने स्पष्ट केले की, या युद्धबंदीत कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका नाही.
पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानला इशारा-
‘भारताला अणूबॉम्बची भीती घालू नये. न्युक्लिअर ब्लॅकमेल आम्ही सहन करणार नाही, अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीला भारत भीक घालत नाही,’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिला आहे.
‘पाकिस्तानला जगायचे असेल, तर त्याला दहशतवादी अड्ड्यांची सफाई करावीच लागेल. त्याशिवाय शांती प्रस्थापित होण्याचा कोणताही मार्ग नाही. दहशतवाद आणि संवाद एकत्रितपणे होऊ शकत नाही.
दहशतवाद आणि व्यापार एकत्रितपणे चालू शकत नाही. पाणी आणि रक्तही एकत्र वाहू शकत नाही. पाकिस्तानसोबत चर्चा होईल, तर ती दहशतवादावरच होईल,’ अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.