भाजप नेते दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पद मृत्यू

अनैसर्गिक मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
भाजप नेते दिलीप घोष यांच्या सावत्र मुलाचा संशयास्पद मृत्यू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील भाजपा नेते दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा श्रीजय दासगुप्ता यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मंगळवारी कोलकाताच्या न्यू टाउन परिसरातील एका फ्लॅटमध्ये श्रीजयचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला. 

श्रीजयला आधी न्यू टाऊनमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर त्याला बिधाननगर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. 

मात्र, श्रीजय याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समजेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री श्रीजयकडे पार्टी होती. त्यासाठी त्याचे दोन मित्र आणि एक मैत्रिण श्रीजयच्या घरी आले होते. मंगळवारी सकाळी ८ वाजता ते सर्वजण दुर्गापूरला जाणार होते, पण सकाळी श्रीजय बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याची ती स्थिती पाहून त्याच्या मित्रांनी ताबडतोब त्याच्या कुटुंबियांना कळवले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

२५ दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

दिलीप घोष यांनी गेल्याच महिन्यात रिंकू मुजूमदार यांच्याशी विवाह केला. हा विवाह कोलकाताच्या न्यू टाउन येथील त्यांच्या निवासस्थानी खासगी समारंभात पार पडला. श्रीजय हा रिंकू मुजूमदार यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. श्रीजयचेही २५ दिवसांपूर्वी लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर श्रीजयचा धक्कादायक मृत्यू झाला. या अनैसर्गिक मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा