रसिक प्रेक्षकांची मिळतेय प्रचंड दाद
पणजी : भाऊ कदम यांचे विनोदी नाटक ‘सिरीयल किलर’ प्रथमच गोव्यात येत आहे. अष्टविनायक आणि सिंधुसंकल्प एन्टरटेन्मेंट यांनी रंगभूमीवर आणलेले हे नाटक आजघडीला रसिक प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळवत आहे.
मराठी रंगभूमीवर अलीकडच्या काळात नवरा-बायकोतील संवाद-विसंवादाच्या नाटकांचे पीक आले आहे. त्याला या नाटकाने छेद दिला आहे. त्याहून लोकांच्या अधिक जवळच्या विषयाला लेखक व दिग्दर्शक केदार देसाई यांनी या नाटकात हात घातला आहे. त्यामुळे ‘सिरीयल किलर’ हा फक्त एक नाट्यप्रयोग नसून तो एक सामाजिक आरसा आहे. घराघरात डोकावणाऱ्या टीव्ही मालिकांच्या अमर्याद प्रभावावर रंजक ताशेरे ओढत, हास्याच्या माध्यमातून एक विचार देणारे हे नाटक आहे.
नावात जरी ‘किलर’ असला तरी हा नायक खून करणारा नसून स्वतःच्या प्रेमात पाडणारा आहे. कारण विनोदाचा हुकमी एक्का म्हणून सुप्रसिद्ध असलेले महाराष्ट्राचे लाडके अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांच्या जबरदस्त टायमिंगने या ‘निरागस’ किलरच्या भूमिकेत रंग भरले आहेत. नेहमीपेक्षा वेगळ्याच प्रकारची त्यांची भूमिका हे या नाटकाच्या यशाचे गमक म्हणता येईल. त्यांच्यासोबत झपाटून टाकणारी भूमिका साकारली आहे दीपाली जाधव यांनी. दोघांची केमिस्ट्री हे नाटकाचे एक प्रमुख आकर्षण आहे. सिनेअभिनेत्री अश्विनी कुलकर्णी आणि सिंधुदुर्गातील उदयोन्मुख अभिनेते तेजस पिंगुळकर यांनी त्यांना साथ दिली आहे. ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचे देखणे नेपथ्य व श्याम चव्हाण यांची सूचक प्रकाशयोजना नाटकाला समृद्ध करते. ‘देवाक काळजी’फेम आजचे आघाडीचे संगीतकार विजय गवंडे यांनी या नाटकाच्या मूळ संकल्पनेला अधोरेखित करणारी संगीतनिर्मिती केल्यामुळे नाटक प्रेक्षणीयच नव्हे, तर श्रवणीयदेखील झाले आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे, या नाटकाचे ‘सिरीयल किलर’ हे नाव गीतकार गुरु ठाकूर यांनी सुचवले आहे.
रंगभूषाकार उल्लेश खंदारे यांची रंगभूषा व ईशान देसाई यांची वेशभूषा असून नाटकाची निर्मिती प्रणय तेली यांनी केली आहे.
साखळी, पणजीत प्रयोग
शुक्रवार दि. १६ मे रोजी रात्री ८ वाजता रवींद्र भवन, साखळी व शनिवार दि. १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता कला अकादमी, पणजी येथे या नाटकाच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.