नवी दिल्ली : भालाफेक क्रीडा प्रकारात भारताचा मान जगभरात उंचावणारा ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल या मानद पदावर बढती देण्यात आली आहे.
नीरज चोप्रा हा भालाफेकमधील जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. त्याने टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून भारताला क्रीडा जगतात मानाचे स्थान मिळवून दिले होते. यानंतर, २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्येही त्याने चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. आता भारतीय सैन्यात त्याला लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाल्याने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नीरज चोप्राचा समावेश भारताच्या टेरिटोरियल आर्मी नियमन, १९४८ च्या पॅरा-३१ अंतर्गत करण्यात आला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नीरजला लेफ्टनंट कर्नलची ही मानद पदवी प्रदान केली आहे. यापूर्वी नीरज राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत होता. त्याने २०१६ मध्ये नायब सुभेदार म्हणून भारतीय सैन्यात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सैन्यातील त्याची निष्ठा आणि क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला गौरवण्यासाठी ही बढती देण्यात आली आहे.
टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या खेळाने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. आता सैन्यातील या नव्या जबाबदारीमुळे त्याच्यावर आणखी मोठी जबाबदारी आली आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात बेंगळुरूमध्ये होणारी एनसी क्लासिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नीरज चोप्रा आता २३ मे रोजी पोलंडमधील चोरझो येथे होणाऱ्या ७१ व्या ऑर्लेन जानूझ कुसोझिन्स्की मेमोरियल कार्यक्रमात सहभागी होणार आहे. क्रीडा क्षेत्रातील त्याची उत्कृष्ट कामगिरी आणि आता सैन्यातील मोठी जबाबदारी, यामुळे नीरज चोप्रा अनेक युवकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे.