दोनापावला दरोड्याच्या तपासाची गती मंदावली

२५ दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच नाही


8 hours ago
दोनापावला दरोड्याच्या तपासाची गती मंदावली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नागाळी-दोनापावला येथील प्रसिद्ध उद्योजकाच्या बंगल्यावर १९ एप्रिल रोजी रात्री दरोडेखोरांनी सुमारे एक किलो दागिन्यासह २ लाख रुपयांची रोख रक्कम पळवून नेली होती. या घटनेला एका महिना होत आला तरी या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती महासंचालक आलोक कुमार यांनी दिली.
या प्रकरणी पणजी पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर १९ एप्रिल रोजी दरोडेखोरांनी रात्री १२ ते पहाटे ४ या दरम्यान दरोडा टाकला होता. त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली होती. दहशत निर्माण करण्यासाठी सुरक्षा रक्षकाचा कान कापला होता. नंतर बंगल्यात प्रवेश केला. घरात फक्त वृद्ध दाम्पत्यच होते. दरोडेखोरांनी त्यांना बेडरूममध्ये पलंगाला बांधून ठेवले आणि घरात लूट केली. बंगल्यातून जाताना त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा नेली होती. २० एप्रिल रोजी सकाळी घरकामगार महिला बंगल्यावर पोहोचल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, फॉरेन्सिक तज्ज्ञांकडूनही धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस प्रशिक्षणार्थी अरुण बालगोत्रा यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केले असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. इतरांच्या चौकशीतून दरोडेखोर पहाटे ५.३० च्या दरम्यान बंगल्यातून बाहेर पडल्याचे समोर आले. घटनेचा कालावधी चुकीचा दिल्यामुळे सुरुवातीला तपासाची दिशा चुकली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.