‘अटल आसरा’चे प्रलंबित २५३ अर्ज निकाली

समाजकल्याण खात्याची विशेष मोहीम : सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना ५६ कोटींचे वाटप


8 hours ago
‘अटल आसरा’चे प्रलंबित २५३ अर्ज निकाली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : समाजकल्याण खात्याने ‘अटल आसरा’ योजनेचे अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. यानुसार राज्यभर सात शिबिरे आयोजित करण्यात आली. यातील पहिल्या तीन शिबिरांतून २५३ प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. बुधवारी सांगे येथे झालेल्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील काही दिवसांत डिचोली, साखळी, सावर्डे आणि मये मतदारसंघांत शिबिरे होणार आहेत. यातून जास्तीत जास्त अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत, अशी माहिती खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी डिचोली मतदासंघात डिचोली नगरपालिका आणि शिक्षा व्हिजन कार्यालय मुळगाव तेथे शिबिर होणार आहे. १७ रोजी साखळी रवींद्र भवन, १९ रोजी धारबांदोडा उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे, तर मये पंचायतमध्ये शिबिरे होणार आहेत. सर्व शिबिरे सकाळी १० वाजता सुरू होतील. ‘अटल आसरा’ योजनेअंतर्गत एससी, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागास लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी ३ लाख रुपये आणि घर दुरुस्तीसाठी १.५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत सुमारे अडीच हजार लाभार्थ्यांना ५६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
याआधी काही कारणास्तव या योजनेच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यास उशीर होत होता. अर्जदारांनी सरकारी जमिनीवरील तसेच भाडेकरूंच्या घरांचे दस्तऐवजीकरण, ईडब्ल्यूएस आणि इतर कागदपत्रांवर प्रक्रिया, टीसीपीचे परवाने मिळवणे आदी योजना मंजूर करण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नव्हत्या. यासाठी योजनेत सुलभता आणण्यात आली आहे. ८ मे अखेरीस खात्याकडे सुमारे ६ हजार अर्ज प्रलंबित होते. दरम्यान, बुधवारी सांगे येथील शिबिरात संचालक अजित पंचवाडकर यांनी सहभागींना त्रुटी दूर करण्यासाठी विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.


गरजू लाभार्थ्यांना प्राधान्य : समाजकल्याणमंत्री
सांगे येथे झालेल्या शिबिरात समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, ज्या गरजू लाभार्थ्यांकडे चार भिंतींची तात्पुरती व्यवस्था आहे; परंतु छप्पर नाही अशांना प्राधान्य दिले जाईल. योजनेसाठीची आवश्यक प्रमाणपत्रे सहजपणे उपलब्ध करून दिली जातील. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर पंधरा दिवसांच्या आत पैसे जमा करण्यात येतील.