एनआयओचा अहवाल : ‘कळसा’मुळे उत्तर भागात मोठा परिणाम शक्य
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : म्हादई जल लवादाने कर्नाटकच्या म्हादई नदीतील पाणी वळवण्याच्या मंजूर केलेल्या दाव्यानुसार नदीचे पाणी वळवले तरी संपूर्ण गोव्यावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र कळसा प्रकल्पामुळे म्हादई अभयारण्याच्या उत्तर भागात मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. हा अहवाल ‘जर्नल ऑफ अर्थ सिस्टीम सायन्स’मध्ये प्रकाशित झाला आहे.
एनआयओचे शास्त्रज्ञ के. अनिल कुमार, डी. शंकर आणि के. सुप्रित यांनी तयार केलेल्या अहवलानुसार लवादाने परवानगी दिल्यानुसार, भांडुरा नाल्यातून २.१८ टीएमसी (६१.७३ दशलक्ष घनमीटर) पाणी वळवल्याने गोवा-कर्नाटक सीमेवरील (नदीच्या) विसर्गावर थोडासाच परिणाम होईल. कळसा प्रकल्पात म्हादई अभयारण्याच्या उत्तरेकडील भागात जल लवादाने परवानगी दिलेल्या १.७२ टीएमसी (४८.७ दशलक्ष घनमीटर) वळवले तर त्याचा मोठा परिमाण होणार आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये निवाड्यात लवादाने कर्नाटकला एकूण १३.४२ टीएमसी (३८० एमसीएम) पाणी मंजूर केले होते. त्यापैकी ८.०२ टीएमसी (२२७ एमसीएम) प्रस्तावित म्हादई जलविद्युत प्रकल्पासाठी, १.५ टीएमसी (४२ एमसीएम) खोऱ्यातील वापर आणि सिंचनासाठी होते. तसेच कळसा प्रवाहातून १.७२ टीएमसी (४८ एमसीएम) आणि प्रस्तावित भांडुरा धरणावर २.१८ टीएमसी (६१ एमसीएम) पाणी वळविण्यास परवानगी दिली होती. लवादाने एकूण कर्नाटकला म्हादई खोऱ्यातील ११० एमसीएम पाणी मलप्रभामध्ये वळविण्याची परवानगी दिली आहे.
संशोधकांच्या मते, पाणी वळविल्यामुळे गोव्याच्या पर्यावरणावर परिणाम होईल, असा दावा केला होता. जो न्यायाधिकरणाने मान्य केला होता, तो योग्य नाही. कारण याचा परिणाम मर्यादित आहे. या प्रकल्पांमुळे मांडवी नदीच्या मुखाशी किंवा कुंभारजुवा कालव्यातील जलवाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. मांडवीतील जलवाहतूक ही भरती-ओहोटीमुळे शक्य होते. जेव्हा म्हादईचा नैसर्गिक प्रवाह कमी असतो, तेव्हा देखील वाहतूक शक्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.
एनआयओच्या अहवालाचा आरजीपीकडून निषेध
एनआयओच्या अहवालात म्हादईचे पाणी वळवले तरी गोव्याला फरक पडणार नाही, असे म्हटले आहे. या गद्दारीचा आम्ही निषेध करतो. येत्या विधानसभा अधिवेशनात रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाकडून (आरजीपी) हा प्रश्न उपस्थित केला जाईल. तसेच म्हादई सभागृह समितीला पत्र लिहून विचारणा करणार असल्याचे आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले.