नोटीस दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार गृह खाते

मुख्य सचिवांकडून स्पष्ट : धोंड, समितीची चौकशी करणार पोलीस


8 hours ago
नोटीस दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार गृह खाते

प्रतिनिधी। गाेवन वार्ता
पणजी : शिरगाव चेंगराचेंगरी प्रकरणी नोटीस जारी केलेल्या आठ अधिकाऱ्यांची चौकशी गृह खाते करणार आहे. हे अधिकारी नोटिसीविषयी गृह खात्याला स्पष्टीकरण देतील, असे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी स्पष्ट केले. चेंगराचेंगरीविषयी डिचोली पोलीस स्थानकात नोंद असलेल्या गुन्ह्याविषयी डिचोली पोलीस तपास करत आहेत. अधिकाऱ्यांना बजावलेल्या नोटिसा आणि डिचोली पोलिसांतील गुन्हा यांचा संबंध नाही, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. दरम्यान, जत्रेच्या आयोजनात प्रशासनाला सहकार्य केले नसल्याचा चौकशी समितीने ठेवलेला ठपका देवस्थान समितीला मान्य नाही. प्रशासनाला समितीने पूर्ण सहकार्य केले होते, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले.
शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेत पहाटे चेंगराचेंगरी होऊन सहा भाविकांचा मृत्यू झाला होता. तसेच १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. सरकारने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी संदीप जॅकीस यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली होती. समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी हा अहवाल जाहीर केला. शिरगाव येथील चेंगराचेंगरी झाली, त्यावेळच्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, डिचोली उपजिल्हाधिकारी, डिचोली पोलीस उपअधीक्षक, डिचोली मामलेदार, डिचोली पोलीस निरीक्षक, मोपाचे पोलीस निरीक्षक आणि शिरगाव पंचायतीचे सचिव यांना नोटिसा बजावल्या होत्या. अहवालावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल्यानंतर नोटिसा जारी करण्याची कार्यवाही झाली. चौकशी समितीने जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस, देवस्थान समिती, शिरगाव पंचायत आणि काही धोंडांचे बेशिस्त वर्तन चेंगराचेंगरीला जबाबदार असल्याचे म्हटले होते. अहवालाच्या निष्कर्षाप्रमाणे संबंधितांना नोटिसा जारी करण्यात आल्या. नोटिसांना संबंधितांनी उत्तर दिल्यानंतर गृह खाते चौकशीसाठी विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करणार आहे, असे मुख्य सचिव डॉ. कांडावेलू यांनी सांगितले.
शिरगाव जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी नोंद झालेल्या एफआयआरनुसार डिचोली पोलीस तपास करणार आहेत. त्यामुळे धोंड, देवस्थान समितीची डिचोली पोलीस चौकशी करतील, अशी माहिती पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली. ज्या दिवशी चेंगराचेंगरी झाली होती, त्याच दिवशी सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, डिचोली पोलीस उपअधीक्षक यांची बदली केली होती.


सहकार्य न केल्याचा ठपका समितीला अमान्य
चौकशी समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालात देवस्थान समितीने प्रशासनाला सहकार्य केले नसल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र तो पूर्णपणे चुकीचा असून आम्हाला तो मान्य नाही. प्रशासनाला आम्ही पूर्णपणे सहकार्य केले होते. याप्रकरणी आम्ही दोषी नाही, असे स्पष्टीकरण देवस्थान समितीचेअध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी दिले आहे. सरकारकडून आम्हाला या अहवालासंदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर आम्ही त्यावर आमची भूमिका स्पष्ट करू. ज्या गोष्टी असतील त्या संपूर्ण महाजनांसमोर मांडून पुढील निर्णय घेऊ. मात्र चाैकशी समितीचा ठपका पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावा अध्यक्ष दीनानाथ गावकर आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.