पाणी वळविण्याच्या परिणामांचा वैज्ञानिकदृष्टीने अभ्यास करावा!

‘म्हादई बचाव अभियान’ लिहिणार सरकारला पत्र

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
पाणी वळविण्याच्या परिणामांचा वैज्ञानिकदृष्टीने अभ्यास करावा!

पणजी : म्हादईचे पाणी वळविल्यानंतर गोव्याचा निसर्ग आणि पाण्यावर किती प्रमाणात परिणाम होणार, याचा वैज्ञानिकदृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे. सरकारने मान्यताप्राप्त वैज्ञानिक किंवा संस्थेमार्फत अभ्यास करावा, अशी मागणी म्हादई बचाव अभियानने केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून अशी मागणी केली जाणार आहे, असे अभियानच्या निमंत्रक निर्मला सावंत यांनी सांगितले.
एनआयओचे वैज्ञानिक के. अनिल कुमार, डी. शंकर आणि के. सुप्रीत यांनी म्हादईच्या पाण्यावर अभ्यास केला आहे. त्याचा अहवाल जर्नल ऑफ अर्थ सिस्टीम सायन्समध्ये प्रकाशित झाला आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविले तर गोव्यावर जास्त परिणाम होणार नाही, असा निष्कर्ष अहवालात आहे. या निष्कर्षामुळे गोव्याचे पर्यावरण कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. हा अहवाल पक्षपाती असल्याचा आरोप झाला आहे. अहवालाच्या वैधतेविषयी सुद्धा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ज्या वैज्ञानिकांनी हा अहवाल तयार केला आहे, तो कुठल्या निकषांवर केला आहे. त्यांनी म्हादई नदीला फेरी मारून ही माहिती मिळविली की काय? हे स्पष्ट व्हायला हवे. कुठल्याही वैज्ञानिकांनी अभ्यास करून निष्कर्ष जारी केला म्हणून त्याला सरकार किंवा न्यायालय मान्यता देऊ शकत नाही. म्हादईचे पाणी आणि पाणी वळविल्यावर गोव्याचा निसर्ग आणि पाणी पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांचा वैज्ञानिकदृष्टीने अभ्यास व्हायला हवा. सरकारने तसा अभ्यास करायला हवा. नाहीतर कोणीही वैज्ञानिक प्रबंध किंवा इतर माध्यमातून आपणाला हवा तसा निष्कर्ष काढत राहतील, असे निमंत्रक निर्मला सावंत यांनी म्हटले आहे.

निष्कर्ष पक्षपाती : राजेंद्र केरकर
अभियानाचे सदस्य राजेंद्र केरकर यांनीही या निष्कर्षावर संशय व्यक्त केला आहे. हा अहवाल तयार करणाऱ्या वैज्ञानिकांनी म्हादईची केव्हाही पाहणी केलेली नाही. पाणी किंवा इतर आवश्यक तपशील एकत्र केलेला नाही. पाऊस आणि पाण्याविषयी उपलब्ध असलेल्या माहितीवर त्यांचे संशोधन आहे. हा निष्कर्ष पक्षपाती आहे, असे प्रा. राजेंद्र केरकर यांनी म्हटले आहे. म्हादईच्या पात्रात उन्हाळ्यात किती पाणी असते, पावसाळ्यात किती असते, पाणी कुठपर्यंत पोचते, त्याची माहिती घेऊन संशोधन व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा