डेंग्यू ,मलेरिया रोखण्यासाठी बोट मालकांना सक्त ताकीद

सतर्कतेच्या सूचना : बंदर कप्तान खात्याकडून विविध निर्देश जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
डेंग्यू ,मलेरिया रोखण्यासाठी बोट मालकांना सक्त ताकीद

पणजी : पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया यासारख्या वेक्टर बोर्न रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंदर कप्तान खात्याने बार्जमालक, वॉटरस्पोर्ट्स बोट मालक, जहाज दुरुस्ती आणि मॅन्युफॅक्चरिंग यार्ड, होडी मालक आणि इतर सर्व बोट मालकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यानुसार बार्जच्या कार्गो होल्डमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करणे व जमा झालेले पाणी नियमितपणे बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जहाज मालकांनी बार्जमध्ये वापरल्या जाणाऱ्या टायरमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. लहान जहाजे, वॉटरस्पोर्ट्स बोटींच्या मालकांनी पावसाळ्यात त्यांचे जहाज ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवणे आवश्यक आहे. वापरात नसलेल्या जहाजात पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
मालकांनी ट्रॉलर किंवा जेटीवर काम करणाऱ्या कामगारांची मलेरियासाठी तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्यासाठी आरोग्य खात्याकडून हेल्थ कार्ड घेणे आवश्यक आहे. वर्कशॉप/डॉकमध्ये काम करणाऱ्या मजुरांची मलेरियाची तपासणी करणे आवश्यक आहे. मालक, जहाज उत्पादक, दुरुस्ती यार्ड करणाऱ्यांनी यार्ड किंवा डॉक परिसरात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे.

उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई!
सर्व बार्जेस, पॅसेंजर लाँच, फेरी बोटी, फिशिंग ट्रॉलरचे टिंडेल, यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी बोटी मालक, पर्यटक बोटी, क्रूझ बोट्स मालक, जहाज उत्पादक इत्यादींना या आदेशांची योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आदेशांचे उल्लंघन झाल्यास खात्याकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.      

हेही वाचा