किती वाहनांचा होणार लिलाव? सविस्तर वाचा...
पणजी: कदंब महामंडळासह सरकारी खात्यांतील १५ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच १५ वर्षे पूर्ण न होताही विविध कारणांमुळे पडून असलेल्या ११० वाहनांच्या लिलावास गुरूवारी सुरुवात झाली. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून पर्वरीतील कदंब डेपोत या लिलाव सुरूवात झाली. बोली दुपारी ३ वाजेपर्यंत लावता येणार असून साहजिकच सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना वाहने दिली जातील.
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने कदंब वाहतूक महामंडळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, नियोजन आणि सांख्यिकी विभाग, वीज खाते, शिक्षण खाते, गोवा शिक्षण विकास महामंडळ, गोवा विधानसभा, सामान्य प्रशासन विभाग आणि पोलीस महानिरीक्षक कार्यालय यांच्या मालकीच्या ११० जुन्या वाहनांचा लिलाव सुरू केला आहे.
कोणाला वाहने खरेदी करता येणार?
१५ वर्षांपेक्षा जुनी वाहने फक्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा असलेल्या कंत्राटदारांकडूनच खरेदी केली जाऊ शकतात तर १५ वर्षांपेक्षा कमी वयाची वाहने सामान्य जनता खरेदी करू शकते. या सर्व ११० जुन्या वाहनांची किमान एकूण किंमत ५८.९५ लाख रुपये आहे. ११० वाहनांपैकी ७७ वाहने १५ वर्षे जुनी आहेत आणि ३३ वाहने १५ वर्षांपेक्षा कमी जुनी आहेत.
'अशी' असेल लिलावाची पद्धत-
लिलावासाठी ठेवलेल्या वाहनांवर लॉट क्रमांक लिहिले असून बाजूला असलेल्या वाहनांच्या यादीतील वाहनांची किमान किंमत पाहून आणि लॉट क्रमांकाच्या बाजूला लिहिलेल्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त बोली कागदावर लिहून कागद नजीकच्या पेटीत टाकायचा आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत लिलाव पूर्ण होईल आणि लिलाव बॉक्स दुपारी ३.३० वाजता उघडेल.
'अशा' आहेत वाहनांच्या किमती-
१५ वर्षांखालील वाहनांच्या किमान किमती सामान्य लोकांना खूपच परवडणाऱ्या आहेत. यामध्ये टोयोटा इनोव्हाजची किमान किंमत ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत, टाटा सुमो आणि महिंद्रा स्कॉर्पिओची किमान किंमत ५४ हजार रुपयांपर्यंत, तर बुलेटची किमान किंमत ४,८०० रुपये, बजाज पल्सरची किमान किंमत ४ हजार आणि स्पेलँडर ३,६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या किमतीपेक्षा जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीला वाहन खरेदी करता येणार आहे.