गोवा सरकारकडून 'माझी बस योजना' नव्याने अधिसूचित

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
8 hours ago
गोवा सरकारकडून 'माझी बस योजना' नव्याने अधिसूचित

पणजी : वाहतूक खात्याने २०२३ मध्ये आणलेली 'माझी बस योजना' गोवा सरकारने नव्याने अधिसूचित केली आहे. नव्या योजनेत खाजगी बस चालकांना पूर्वीपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यानुसार बस चालकांना प्रती किलोमीटर ३ रुपये अनुदान, विम्यातील ५० टक्के निधी तसेच नवी बस घेण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. पूर्वीप्रमाणे चालकांना मिळालेल्या तिकीट विक्रीतील हिस्सा कदंबला द्यावा लागणार नाही. 

वाहतूक खात्याने नुकत्याच अधिसूचित केलेल्या योजनेनुसार आवश्यक परवाने असलेल्या बस चालकांना या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेत पंधरा वर्षांपेक्षा जुन्या बस चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र योजनेच्या सुरुवातीची तीन वर्षे २० वीस वर्षांपर्यंत जुन्या बससाठी परवानगी असणार आहे. अर्जदार व्यक्ती गोव्यातील नोंदणीकृत मालक असणे आवश्यक आहे. बस चालकांना त्यांच्या बसेसवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम कदंब महामंडळ प्रशासकीय व अन्य खर्चासाठी राखून ठेवणार आहे.

योजनेअंतर्गत सर्व बसेसमध्ये कदंब महामंडळाचे स्मार्ट ट्रान्झिट पास आणि स्मार्ट ट्रान्झिट कार्ड हे वैध भाडेपट्टा म्हणून स्वीकारले जातील. महामंडळाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या पास आणि कार्ड्सद्वारे गोळा केलेली रक्कम संबंधित ऑपरेटरना परत केली जाईल. बस मालक, कंडक्टर किंवा चालक वाहन लॉग बुक राखण्याची जबाबदारी घेईल. त्यांनी प्रत्येक ट्रिपच्या माहिती नोंद करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रस्थान आणि आगमन वेळ, अंतर आणि देखभालीच्या आवश्यकतांचा समावेश असेल.

हेही वाचा