अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण; ४ माजी संचालकांना ईओसीकडून अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण; ४ माजी संचालकांना ईओसीकडून अटक

पणजी : पिर्ण - बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ११.२८ कोटींची फसवणूक केली होती . याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर आणि प्रकाश ए. नाईक या सोसायटीचे माजी संचालकांना अटक केली आहे. 

या प्रकरणी प्रथम गुंतवणूकदारांनी प्रशासक आणि ईओसीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर यात काही होत नसल्याचे समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, सोसायटीवर प्रशासक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी ईओसीत तक्रार दाखल केली. त्यानुसार, १४ जुलै २०२३ पूर्वी माजी संचालक मंडळाने एकमेकांच्या संगनमताने, अप्रामाणिक हेतूने विविध बेकायदेशीर कृत्ये करून अष्टगंधा अर्बन क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निधीचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.

तसेच माजी संचालकांनी काल्पनिक आणि बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज दिल्याचे दाखवले. तसेच इतर बेकायदेशीर कृत्ये करून सोसायटीचा निधी अनधिकृतपणे काढला. याशिवाय वैयक्तिक खात्यात निधीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचे म्हटले होते. त्यामुळे माजी संचालक मंडळ सोसायटीचे ठेवीदार तसेच सदस्यांच्या ठेवी परत करण्यात अयशस्वी ठरले. त्यामुळे माजी संचालक मंडळाने ११ कोटी २८ लाख ९३ हजार २१३ रुपयांची फसवणूक केल्याचा दावा तक्रारीत केला होता. याची दखल घेऊन ईओसीचे निरीक्षक रमेश शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी सोसायटीचे माजी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

 त्यात माजी संचालक रवींद्र नाईक (मुळगाव - डिचोली), दिगंबर परब (डिचोली), मोहनदास देसाई (कुडचडे), पिर्ण - बार्देश येथील श्रद्धा नाईक, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक आणि प्रकाश ए. नाईक, सिरसई येथील कृष्णा हळर्णकर, चंद्रशेखर बर्वे (अस्नोडा - बार्देश), प्रकाश कांदोळकर (पार्शे - पेडणे) आणि भारत परब (अस्नोडा - बार्देश) यांचा समावेश आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर दिगंबर परब, मोहनदास देसाई, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर, प्रकाश ए. नाईक आणि प्रकाश एन. कांदोळकर या माजी संचालकांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केले. दरम्यान काही गुंतवणूक दारांनी या अर्जाला आक्षेप घेत हस्तक्षेप दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने सर्वाची बाजू एेकून घेतल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले होते. आता वरील प्रकरणी, ईओसीने  प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर अणि प्रकाश ए. नाईक या चार माजी संचालकांना अटक केली आहे.

हेही वाचा