वादळी वाऱ्याचा तडाखा बसून सत्तरी तालुक्यात नैसर्गिक हानी

ब्रह्मकरमळी येथे घरावर झाड पडल्यामुळे नुकसान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
वादळी वाऱ्याचा तडाखा बसून सत्तरी तालुक्यात नैसर्गिक हानी

वाळपई : सत्तरी तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका बसून अनेक ठिकाणी नुकसान झाले. ब्रह्मकरमळी येथील काशिनाथ गावडे यांच्या घरावर निरफणसाचे झाड पडून सुमारे २० हजार रुपयांची हानी झाली. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन सुमारे ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचविली.

गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सत्तरी तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मकरमळी येथील काशिनाथ गावडे यांच्या घरावर झाड पडले. त्यांचे यामुळे २० हजार रुपयांचे नुकसानी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ धाव घेऊन घरावर पडलेले झाड हटविले. यात ५० हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

वादळीवाऱ्याचा फटका बसल्यामुळे सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यामुळे आंबा उत्पादकांना याचा फटका बसला. सत्तरी तालुक्यात आंब्याचे उत्पादन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होते. सध्या आणखीन आठ दिवसांनी आंबे तयार होणार होते. मात्र, वाऱ्याचा फटका बसल्यामुळे आंब्याची मोठी हानी झाली.

याबाबत आंबा उत्पादकांनी खंत व्यक्त केली आहे. अंतिम टप्प्यात अशाप्रकारे आंब्याचे नुकसान झाल्यामुळे आंबा उत्पादकांना फटका बसलेला आहे.

सत्तरी तालुक्यात अनेक भागांमध्ये पाऊस पडल्यामुळे वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याचे समजते. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.