कारवाई करण्याची तुरूंग प्रशासनाकडे तक्रार
पणजी : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात देखभालीसाठी ठेवलेल्या फिरोज सुर्वे या कैद्यालाच फरीद शेख या संशयित कैद्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत कैदी सुर्वे याच्या पायाचे हाड तुटले आहे.
ही घटना काही दिवसांपूर्वी कारागृहात घडली असून कैदी फिरोज सुर्वे याने फरीद शेख याच्याविरुद्ध तुरूंग प्रशासनाकडे तक्रार दिली आहे.
कैदी फरीद शेख याने आजारपणाचे कारण पुढे करून कारागृह प्रशासनाला सांगून कैदी सुर्वे याला आपल्या देखभालीसाठी स्वतःजवळ ठेवले होते.
काही दिवसानंतर शेख याने सुर्वे याचा मारहाण करून छळ चालवला. मागील आठवड्यात शेख याने फिरोजला क्षुल्लक कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सुर्वे जबर जखमी झाला. त्याच्या पायाचे हाड मोडले गेले.
म्हापसा जिल्हा इस्पितळात जखमी सुर्वेवर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली असून या मारहाण प्रकरणी कैदी फरीदवर योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्याने तुरूंग प्रशासनाकडे लिखित तक्रारीद्वारे केली आहे. अद्याप कारागृह प्रशासनाकडून या प्रकरणासह संबंधित तक्रारीची दखल घेतलेली नाही.
दरम्यान, कैदी फरीद शेख याने काही कैद्यांशी मैत्री करून कारागृहात आपली एक टोळी निर्माण केली आहे. या टोळीच्या आधारे शेख हा कारागृह कर्मचार्यांना देखील धमकावत आहे. शेख याच्या दहशतीकडे कारागृह प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच फिरोज सुर्वे या कैद्यावर हल्ला करण्याचा प्रकार शेख याच्याकडून घडला असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली आहे.