कळंगुट येथे शॅकमध्ये झाला होता खून
म्हापसा : कळंगुट येथील समुद्रकिनाऱ्यावरील मरीना बीच शॅकमध्ये झालेल्या बोल्ला रवि तेजा (२८, रा. हैदराबाद-आंध्र प्रदेश) याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी शुबर्ट आग्नेलो सिल्वेरा व आग्नेलो लॉरेन्स सिल्वेरा या शॅक मालक पितापुत्राची सशर्त जामिनावर म्हापसा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुटका केली.
प्रत्येकी २५ हजार रुपयांची हमी व तितक्याच रकमेचा हमीदार, न्यायालयाच्या परवानगीविना गोवा तसेच देशाबोहर न जाणे अशा अटींसह वरील संशयितांचा जामीन अर्ज न्यायाधीश राम सुब्राय प्रभू देसाई यांनी मंजूर केला. संशयितांच्यावतीने अॅड. मायकल नाझारेथ व अॅड. विनायक पोरोब यांनी तर सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील पी. नारूलकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
दरम्यान, हा खुनाचा प्रकार ३१ डिसेंबर २०२५ रोजी उत्तररात्री १ वा. सुमारास घडला होता. बोल्ला रवि तेजा व त्याचे मित्र फिर्यादी स्पंदन बोल्लू (रा. हैदराबाद), चैतन्य पानपडू, काईराम गिरीधर, दीपक सत्यनारायण, ज्योती चलांचलम्, दर्शनी नैदी व सत्यवर्षिनी नायडू या मित्रमैत्रिणींचा गट नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आला होता.
सोमवारी मध्यरात्री हा गट कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील मरिना बीच शॅकमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. शॅक बंद करण्याची वेळ झाल्यामुळे संशयित शॅक कर्मचाऱ्यांनी या गटाला जेवणाची ऑर्डर लवकर देण्यास सांगितली. यावरून शॅक कर्मचारी व या पर्यटकांमध्ये वाद झाला. याचे पर्यावसन हाणामारीत झाले. या मारामारीत गंभीर जखमी झालेल्या बोल्ला रवि तेजा याचा मृत्यू झाला.
सहा जणांना केली होती अटक
खून प्रकरणी कळंगुट पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आग्नेल सिल्वेरा (६४, रा. तिवायवाडा कळंगुट) व शुबर्ट आग्नेल सिल्वेरा (२३) या शॅक मालक पितापुत्रासह कामगार अनिल कमल बिश्त (२४, रा. मूळ नेपाळ) व कमल सुनार (२३, रा. मूळ नेपाळ), सुमन सुनार (२२, रा. नेपाळ ) व गणेश पवार (३६, रा. बिजापूर कर्नाटक) या सहा जणांना अटक केली होती.