प्रसाद शेट काणकोणकर
राज्यात मागील पंधरा दिवसांत अनेक प्रकारच्या दुर्घटना घडल्या. त्यातील काही दुर्घटनांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. याशिवाय आपली कायदा व सुव्यवस्था किती निष्क्रिय आहे, हे दाखवून दिले. तसेच कायद्याचे किती पालन होते, हेही उजेडात आले.
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात एक धक्कादायक आणि धार्मिक उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली. शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवात शनिवार ३ रोजी पहाटे जमलेले भाविक, धोंडांमध्ये अचानकपणे चेंगराचेंगरी झाली. त्यात ६ भाविकांचा मृत्यू झाला तर सुमारे ७० भाविक जखमी झाले. यापैकी तीन ते चार जणांवर बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल घेऊन सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे. त्यात आठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत. घटना झाली तेव्हाचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, डिचोली उपजिल्होधिकारी, डिचोली पोलीस उपअधीक्षक, डिचोली मामलेदार, डिचोली पोलीस निरीक्षक, मोपा पोलीस निरीक्षक आणि शिरगाव पंचायत सचिव यांना दोषी ठरविले आहे. या समितीने भविष्यात अशा घटना होऊ नये म्हणून काही उपाययोजना सुचविल्या आहेत. याचे सरकार, पोलीस, प्रशासन तसेच नागरिक काटेकोरपणे पालन करतील.
याशिवाय राज्यात कालव्यात तसेच हॉटेलच्या स्वीमिंगपूलमध्ये बुडून दोन चिमुकलींचा मृत्यू झाला तसेच अपघाती मृत्यूतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात तर एकाच दिवशी वेगवेगळ्या अपघातांत चार युवकांचा मृत्यू झाला. याशिवाय बिर्ला चौकातून वास्कोकडे जाणारी मिनी बस क्विनीनगर-सांकवाळ महामार्गावर उलटल्याने कंडक्टर जागीच ठार झाला. या बसचा चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचे नंतर समोर आले. मागील काही दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाण कमी झाल्यामुळे अपघात वाढले आहेत.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाडेकरू पडताळणी मोहीम राबवण्यात आली. तसेच सुरक्षेचा दृष्टीने यंत्रणांचा राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात अनेक भाडेकरूंची, तसेच विदेशी नागरिकांची माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे.
गोव्यात पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र काही क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने महिला सुरक्षा, सायबर गुन्हे आणि भाडेकरू तपासणी या सारख्या बाबींमध्ये अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय अमली पदार्थ तस्करी विरोधी केलेल्या कारवाईची दखल घेतली असता, राज्यात ड्रग्ज सर्व परिसरात तसेच मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाप्रश्नी राज्य सरकार आणि पोलीस विभागाने या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.