‘किंग’ कोहलीचा धक्का

नवे चेहरे येऊन मैदान गाजवू लागले आहेत. हे नवे चेहरे फक्त आयपीएल नव्हे तर कसोटी सामन्यांमध्येही जादू दाखवू शकतील का, हा प्रश्न आहे. विराटने कदाचित आयपीएलमधील आपली कामगिरी पाहूनच निवृत्तीचा विचार केला असण्याची शक्यता आहे.

Story: अग्रलेख |
15th May, 09:56 am
‘किंग’ कोहलीचा धक्का

विराट कोहली. सचिन तेंडुलकरनंतर गेल्या दीड दशकात क्रिकेटच्या जगतात नावाजलेले नाव. तसे पहायला गेल्यास गेल्या वीस पंचवीस वर्षांत नव्या पिढीला माहिती असलेले काही मोजकेच प्रचंड गाजलेले खेळाडू आहेत, त्यात विराटचे नाव येते. राहुल द्रवीड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली ही नावे भारतातच नव्हे तर जगाच्या क्रिकेट क्षेत्रात गाजली. कोहलीला किंग कोहली हे नावही चाहत्यांनी दिले. रोहितसाठी रोहीट, धोनीसाठी माही तसेच विराटसाठी किंग अशा नावांची यादीच भारतीय क्रिकेट क्षेत्रात दिसते. याच आघाडीच्या क्रिकेटपटूंमध्ये विराट येतो. जून २०११ मध्ये विराटने कसोटीत पदार्पण केले. तेव्हापासून १२३ कसोटीतून दमदार कामगिरी करणाऱ्या विराटने निवृत्ती घेतली. कसोटीत खेळणाऱ्या खेळाडूची सहनशीलता, त्याचे खेळपट्टीवर टिकून राहण्याचे सामर्थ्य, कुठल्याच गोलंदाजाच्या आक्रमणाला सहज बळी न पडणे आणि सलगपणे खेळून चांगल्या खेळाचे प्रदर्शन करणे अशा अनेक बाबींमुळे कसोटीत खेळणारा खेळाडू हा चाहत्यांमध्ये लोकप्रिय होतो. विराटने १२३ कसोटीत ९,२३० धावा करून आपला दबदबा ठेवला.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटने २००८ मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये त्याने सातत्यपूर्ण आणि लक्षवेधी कामगिरी केली, त्यामुळेच भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये विराटचे वेगळे स्थान आहे. सौरव गांगुलीएवढी नसली तरी त्या दर्जाचीच आक्रमक नेतृत्वशैली विराटने दाखवली. विदेशातील अनेक कसोटींमध्ये विजय मिळवून देणारा कर्णधार अशीही त्याची ख्याती आहे. २०१८ मध्ये त्याच्या याच खेळाच्या नेतृत्वगुणांमुळे तो कसोटीतील क्रमांक एकचा खेळाडू बनला होता. मैदानावर कायम सतर्क राहणारा आणि सहकारी खेळाडूंसोबत खेळाच्या बाबतीत गांभीर्य दाखवतानाच कोट्या करून विनोद करण्यातही विराटचा हात कोणी धरू शकत नाही. वातावरण जल्लोषपूर्ण ठेवण्याची किमया विराटने नेहमीच साधली. कसोटीतून तो निवृत्त होत असला तरी एकदिवसीय, आयपीएल सारख्या खेळातून विराटच्या खेळाचे दर्शन होणारच आहे. तरीही त्याने कसोटीतून लवकर निवृत्ती घेतली, अशीच क्रिकेटप्रेमींची भावना झाली आहे. फिटनेस आणि आहाराच्या शिस्तीत विराटने नेहमीच इतर खेळाडूंनाही आदर्श घालून दिला. त्याची इतर सहकाऱ्यांप्रती असलेली वागणूकही त्याच्या 'किंग कोहली' या बिरुदाला साजेशीच आहे. त्याने खडतर काळही पाहिला, पण त्यातून बाहेर पडून मोठ्या शतकासह त्याने पुनरागमनही केले. समाज माध्यमांवर आज करोडो फॉलोअर्स असलेला जागतिक दर्जाचा हा खेळाडू नेहमीच चर्चेतही राहतो. 


कसोटी क्रिकेटमध्ये २९ शतके नावावर असलेल्या विराटला १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त ७७० धावा हव्या होत्या. अशावेळी विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे त्याची चर्चाही होत आहे. सुनील गावस्कर यांचा कसोटीतील १०,१२२ धावांचा विक्रम आहे. भारतातील महान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, त्या सचिन तेंडुलकरचा विक्रम हा १५,९२१ धावांचा आहे. जो यापुढेही कधी कोणी मोडू शकेल याबाबत शंकाच आहे. त्यानंतर राहुल द्रवीड १३,२६५ धावांनी दुसऱ्या तर १०,१२२ धावांसह सुनील गावस्कर तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानावर विराट कोहली आहे. पाचव्या स्थानी ८,७८१ धावांसह व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आहे. या पाचही खेळाडूंच्या जवळही जाणे सध्याच्या खेळाडूंना जमेल का, हा प्रश्न आहे. आयपीएलच्या नादात अनेक खेळाडू अल्पकाळासाठी खेळून क्रिकेटमधून कालबाह्य होत असताना कसोटी क्रिकेटचा दर्जा राखण्यासाठी आक्रमक फलंदाजी करणारे, मैदानावर टिकून राहणारे खेळाडू तयार व्हायला हवेत. तेंडुलकर, द्रवीड, सेहवाग, विराट सारख्या खेळाडूंनी नव्या खेळाडूंना शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचे धडे द्यायला हवेत. सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात अनेक मुरलेल्या खेळाडूंकडून म्हणावे तसे खेळाचे प्रदर्शन झालेले नाही. नवे चेहरे येऊन मैदान गाजवू लागले आहेत. हे नवे चेहरे फक्त आयपीएल नव्हे तर कसोटी सामन्यांमध्येही जादू दाखवू शकतील का, हा प्रश्न आहे. विराटने कदाचित आयपीएलमधील आपली कामगिरी पाहूनच निवृत्तीचा विचार केला असण्याची शक्यता आहे. एरवी कसोटीतील इतर तिघांच्या विक्रमाजवळ जाण्यासाठी विराटला अजून बरीच मजल मारावी लागली असती. त्यापेक्षा पहिल्या पाचमध्ये चौथ्या स्थानावर राहून विराटने कसोटीतून निवृत्त होणेच योग्य समजले असावे. कसोटी सामन्यांमध्ये विराटची जागा एखाद्या नव्या खेळाडूने घेऊन अशाच प्रकारची झंझावाती खेळी करावी, हीच अपेक्षा आहे.