पहिल्यांदा रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ उडाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय कसोटी संघाच्या फलंदाजीचे आधारस्तंभ होते. विराटने १४ वर्षांच्या कारकिर्दीत १२३ कसोटी सामन्यांत ९,२३० धावा केल्या, ज्यात ३० शतके आणि ३१ अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याचा सरासरी ४६.८५ असून, तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. कर्णधार म्हणून, कोहलीने २०१४ ते २०२२ या काळात ६८ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले, ज्यात ४० विजय मिळवले. त्याच्या आक्रमक नेतृत्व शैलीने आणि फिटनेसवर दिलेल्या भरामुळे भारतीय संघाने जागतिक स्तरावर आपली छाप सोडली.
तर रोहितने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४,३०१ धावा केल्या, ज्यात १२ शतके आणि १५ अर्धशतके समाविष्ट आहेत, आणि त्याची सरासरी ४०.५७ होती. कर्णधार म्हणून रोहितने २४ सामन्यांचे नेतृत्व केले. त्यात १२ विजय मिळवले आणि ९ पराभवांचा सामना केला. ३ सामने अनिर्णित राहिले. त्याच्या विजयाची सरासरी ५० टक्के होती. रोहितच्या निवृत्तीमागे त्याचा अलीकडील खराब फॉर्म आणि संघाच्या पराभवांची मालिका हे कारणीभूत ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ ३१ धावा केल्या, ज्यामुळे त्याला शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले होते.
कोहलीनेही खराब फॉर्ममुळे कसोटी क्रिकेटला अलविदा केला. सोमवारी त्याने इंस्टाग्रामवर लिहिले, कसोटी क्रिकेटने माझी परीक्षा घेतली आहे, मला आकार दिला आहे, असे धडे शिकवले आहेत जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.
डिसेंबर - जानेवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराटची कामगिरी चांगली नव्हती. या मालिकेत त्याने २३.७५ च्या सरासरीने धावा केल्या. ८ पैकी ७ वेळा तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला.
रोहितच्या निवृत्तीनंतर, जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल हे पुढील कसोटी कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये भारताला विजय मिळवून दिला, परंतु त्यांच्या फिटनेसच्या चिंतेमुळे गिलला दीर्घकालीन पर्याय म्हणून पाहिले जात आहे. तर कोहलीची जागा श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, करुण नायर हे खेळाडू घेऊ शकतात.
रोहित आणि विराटच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीमुळे संघात मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधीही मिळणार आहे. या दोन दिग्गजांनी भारतीय क्रिकेटसाठी जे योगदान दिले आहे, ते नेहमीच स्मरणात राहील आणि युवा खेळाडूंना प्रेरणा देत राहील.
- प्रवीण साठे