ड्रोन युद्धाचे पर्यवसान मोठ्या युद्धात झाले तर पाकिस्तानला ते परवडणार नाही, हे सत्य त्यांनी मान्य करायला हवे. दुर्दैवाने पाकिस्तान हे सत्य मान्य करत नाही, त्यामुळेच दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
दहशतवादामुळे जगात बदनाम असलेल्या पाकिस्तानने भारताच्या वाटेला येण्याच्या कुरापती सुरू केल्या आहेत. भारतात आजपर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे म्होरके पाकिस्तानमध्येच आहेत. अमेरिकेचा प्रमुख आरोपी असलेला ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानातच आश्रय दिला होता. पाकिस्तानने दाऊदपासून ओसामापर्यंत सर्वांना आपल्या छत्रछायेत ठेवून जगातील अनेक देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील ९/११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेल्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानात येऊन ठार केले होते. भारताने तर यापूर्वीही काहीवेळा पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करतानाच त्यांचे तळ उद्धवस्त केले. यापूर्वी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतातच अनेकदा मोठे हल्ले करून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १९९३ चे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, २००१ मधील संसदेवरील हल्ला, मुंबईतील २६/११ चा हल्ला, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगाम असे मोठे हल्ले करून देशात अशांतता माजवण्याचा प्रयत्न दरवेळी केला गेला. काश्मीरमध्ये आतापर्यंत असंख्य दहशतवादी कारवाया लष्कराने परतवून लावल्या आहेत. यापूर्वीही भारताने पाकिस्तानला वेळोवेळी धडा शिकवला आहे. तिथल्या दहशतवाद्यांना भारताकडे सोपवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले. पाकिस्तानने भारतापेक्षा तिथे राहत असलेल्या दहशतवाद्यांना जास्त महत्त्व दिले. पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणामुळेच दहशतवाद्यांचे फावते. पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचे बळी घेतल्यानंतर भारत त्याचा बदला घेणार नाही, असे पाकिस्तानला कदाचित वाटले असावे. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून तिथले दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करून शंभरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांना राहण्यासाठी असलेली निवासस्थाने, प्रशिक्षण केंद्रांना हेरून ती उद्धवस्थ करण्यात आली. मात्र हे करताना भारताने पहिल्या कारवाईत पाकिस्तानातील नागरिक किंवा तिथल्या लष्कराच्या तळांना वगळले. त्यामुळे भारताची कारवाई ही दहशतवाद्यांवर होती. जे पाकिस्तान करू शकत नाही, ते भारताने पाकिस्तानात घुसून केले. त्यामुळे पाकिस्तानने हा हल्ला म्हणजे त्यांच्या देशावर हल्ला समजून आकांडतांडव करण्याची मुळात आवश्यकता नाही. तरीही 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानने आगळीक करण्याचे सोडले नाही. भारतावर क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. भारताने नव्या संरक्षण प्रमाणींचा वापर करून ती हवेतच निष्क्रिय केल्यामुळे फार नुकसान झालेले नाही, पण या गोष्टी पाकिस्तानने मुळात करणेच चुकीचे आहे.
गुरुवारी छापून आलेल्या अग्रलेखातही पाकिस्तान हा आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या कोसळलेला देश आहे, हे स्पष्ट म्हटलेले आहे. पाकिस्तानला स्वतःचे असे पक्के मत नाही. गोंधळून जाऊन अपरिपक्वता दाखवणे, हेच काम पाकिस्तानने केले आणि दरवेळी भारताकडून पाकिस्तानने सपाटून मारच खाल्ला. युद्ध असो किंवा दहशतवादाविरोधातील लढाई, पाकिस्तानला नेहमीच भारताने धूळ चारली. त्यामुळे यावेळीही भारताने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला किंवा नागरिकांना त्रास दिला नव्हता. जे दहशतवाद प्रशिक्षणाचे तळ हेरले गेले त्यावरच हल्ला केला. पण त्यानंतर पाकिस्तानने आगळीक सुरू केली. पाकिस्तानकडून बुधवारी मध्यरात्रीनंतर भारतावर ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न झाले ज्यात श्रीनगर, जम्मू, पंजाब सारख्या भागातील लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला; तो भारतीय संरक्षण यंत्रणांनी परतवून लावला. त्यानंतर भारताने गुरुवारी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानावर हल्ला केला. लाहोरमधील संरक्षण यंत्रणा उद्धवस्त केली गेली. त्यानंतर गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून जम्मूत पुन्हा हल्ला झाला. पाकिस्तानने भारताचे चाळीस ते पन्नास जवान ठार केल्याचे जाहीर करून आपला खरा रंग दाखवला. एकूणच स्थिती ही ड्रोनच्या हल्ल्यांपुरती राहण्याची शक्यता फार कमीच. ही युद्धस्थिती आहे. भारताने दहशतावाद्यांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांचा खात्मा करून पाकिस्तानला मुक्ती देण्यासाठी तिथल्या सरकारने आणि लष्कराने भारताला साथ द्यायला हवी. पाकिस्तानला लागलेला हा शाप पुसण्याची ही संधी आहे. ते न करता भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करून पाकिस्तान आपल्या सर्व नाशाला आमंत्रण देत आहे. भारताकडून हल्ले होतात असे नाटक करून इतर देशांसमोर सहानुभूतीसाठी हात पसरण्यापेक्षा भारतासोबत चांगले नाते ठेवण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने प्रयत्न करायला हवेत. प्रसंगी तिथल्या लष्कराने त्या सरकारला त्याची जाणीव करून द्यायला हवी. भारतासोबत चांगले नाते हाच पाकिस्तानच्या भविष्यासाठी चांगला पर्याय. भारतासोबत युद्ध करायचे असेल तर पाकिस्तानने आपला इतिहास तपासून पहायला हवा. मागे काय घडले आहे त्याचे आत्मपरीक्षण करायला हवे. भारतासमोर आपला टिकाव लागणार नाही, याची जाणीव पाकिस्तानला असायला हवी. ती सध्या दिसत नाही. त्यामुळे पोरकटपणा करून पाकिस्तान युद्धाचीच स्थिती तयार करत आहे. ड्रोन युद्धाचे पर्यवसान मोठ्या युद्धात झाले तर पाकिस्तानला ते परवडणार नाही, हे सत्य त्यांनी मान्य करायला हवे. दुर्दैवाने पाकिस्तान हे सत्य मान्य करत नाही, त्यामुळेच दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत.