पाकिस्तान दहशतवादाचे तेथील कारखाने बंद करणार नसेल तर हे कारखाने कायमचे बंद पाडण्याचे काम आता आम्हीच करू, असा स्पष्ट संदेशच जागतिक समुदायास भारताने आपल्या कणखर कृतीने दिला आहे.
पाकिस्तानसारखे शेजारी राष्ट्र, शेजारधर्मापेक्षा शत्रूधर्माचे पालन करण्यावरच अधिक भर देऊन त्यानुसारच वागत असेल तर आपली ताकद शत्रूपक्षाला कल्पनाही करता येणार नाही एवढी वाढवणे आणि कोणत्याही प्रसंगाला कोणत्याही वेळी तोंड देण्यासाठी कायम सज्ज राहणे या एककलमी कार्यक्रमास चिकटून राहणे किती गरजेचे होते आणि युद्धविषयक धोरणात हे सर्व कितपत फिट्ट बसत होते हे पाकिस्तानकडील आपल्या तीन चार दिवसांच्या युद्धात ठळकपणे संपूर्ण जगाला कळून आले. फक्त तीन दिवसात पाकिस्तानने भारताची वाढलेली ताकद उघड्या डोळ्यांनी पाहिली. आता या उण्यापुऱ्या तीन दिवसात पाकिस्तानने आपले डोळे तेवढे गमावले नसले तरी खूप काही गमावले आहे. पुन्हा भारताविरुद्ध जगाला दाखवण्यासाठी का होईना उभे रहायचे म्हटले तरी निदान पाच सहा वर्षांचा काळ त्यासाठी जावा लागेल. सध्या 'आयसीयू'त पडून असलेल्या पाकिस्तानी सरकारला पुन्हा जगासमोर आपला सुजलेला चेहरा घेऊन पुढे यायचे असेल तर तर ती त्यांची मर्जी पण तेवढे धाडस करण्याची ताकदही आज त्यांच्यात राहिलेली नाही. आता भारताची वाढलेली शस्त्रसज्जता आणि मिळवलेली ताकद याचे सारे श्रेय अर्थातच पाकिस्तानकडे जाते हे कोणी नाकारण्याचा प्रश्नच उपस्थित नाही. पाकिस्तानसारखा कट्टर शत्रू देश आपला शेजारी असल्याचे म्हटल्यावर त्यासाठी सदासर्वदा डोळ्यात तेल घालून सज्ज राहणे आणि कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड देण्याची तयारी ठेवणे हे ओघाने आलेच.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला वठणीवर आणणे ही तर गरज होतीच पण त्याचबरोबर त्याच देशाने पोसलेल्या दहशतवादाचा चेहरा कायमचा नष्ट करणे हेही तेवढेच महत्वाचे होते. उण्यापुऱ्या तीन साडेतीन दिवसातच भारतीय सेनेने हे काम असे अगदी चोखपणे केले आहे की अमेरिका, चीन, रशियासारख्या बड्या राष्ट्रांनाही भारताचा हेवा वाटावा. दहशतवादाचा अंत ही काळाची गरज आहे असे सारे जग टाहो फोडत सांगत असले तरी त्यादिशेने साधे एक पाऊलही टाकण्याचे धाडस कोणी करत नसताना भारताने ते करावे आणि त्यात जवळपास अर्धे अधिक मैदान मारावे, ही निश्चितच साधी घटना म्हणता येणार नाही. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरा वीस दिवसातच दहशतवाद्यांचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानला असा काही जबरदस्त धडा मिळाला आहे की अजून एक दोन वर्षे निदान दहशतवादाच्या आघाडीवर पाकिस्तानी लष्कर वा प्रशासन कोणताही पुढाकार घेण्याचे धाडस करेल असे वाटत नाही. पहलगाममध्ये २२ एप्रिलला ज्या २६ निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यानी निर्घृण हत्या केली त्यांच्या कुटुंबियांना न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य असल्याचे मानूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आणि आपल्या सेनेने तो अगदी अचूकपणे अमलातही आणला. भारतीय सेनेच्या रोषात आपण सगळेच काही गमावून बसू याची जाणीव झाल्यानंतर निर्लज्ज पाकिस्तानने भारतासमोर असे गुडघे टेकले की जगालाही त्यांची दया यावी. अर्थात तोपर्यंत त्यांना सगळ्याच आघाड्यांवर खूप काही गमवावे लागले होते आणि लढण्याची ताकद तर पूर्ण नष्ट झाली होती.
भारतीय लष्कराने बदला घेण्याच्या भावनेतून जो प्रखर हल्ला केला त्यात पूर्णपणे होरपळून निघालेल्या पाकिस्तानला भलेही अमेरिकेच्या मदतीने युद्धविराम घडवून आणण्यात यश आले असले तरी त्यांची पुढची वाटही तेवढी सहजसोपी राहणार नाही याची जाणीवही त्यांना झालेली आहे, हे प्रकर्षाने दिसून येते. पाकिस्तानमधील प्रमुख मानले जाणारे हवाई तळ भारतीय हवाई हल्ल्यात पुरते उद्धवस्त झाल्याने पाकिस्तानला अधिक काही करता आले नाही हा एक महत्वाचा मुद्दा असला तरी ज्या अण्वस्त्राच्या आधारावर पाकिस्तानचे सरसकट सगळेच राजकीय नेते मोठ्या गमजा मारत होते, तेच आण्विक कमांड केंद्र भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आल्यानंतर आता आपली धडगत नाही हे जाणूनच पाकिस्तानने लोटांगण घातले आणि त्यांचा पुरता विनाश टळला. आता अनेकांना वाटते की भारतीय सेनेने पाकिस्तानात एवढी खोलवर मुसंडी मारली होतीच तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय झेंडा फडकविण्याची चालून आलेली संधी का सोडली. काँग्रेससहीत अनेक विरोधी पक्षही भारतीय सेनेने बजावलेल्या देदीप्यमान कामगिरीकडे दुर्लक्ष करत सरकारवर राजकीय उद्देशाने शाब्दिक गोळीबार करू लागले आहेत. आता पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणे आणि दहशतवादाचा अंत घडवून आणणे हाच 'सिंदूर ऑपरेशन'मागील स्पष्ट उद्देश असताना भलतीकडेच भरकटत जाण्याने त्याला वेगळाच रंग जगाने दिला असता आणि त्याचा गैरफायदा घेण्यात चीनसारखी देश टपून बसला असताना आपले निर्धारित उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर योग्य संधी साधून युद्धविराम केल्याने खूप काही पदरी पडल्याचे म्हणता येईल.
भारताने पाकिस्तानकडील तीन चार दिवसांच्या युद्धातून जे काही साध्य केले आहे, त्याचा विचार केल्यास जगाला या कारवाईतून एक स्पष्ट संदेश मिळाला आहे हे मान्य करावेच लागेल. पाकिस्तान दहशतवादाचे तेथील कारखाने बंद करणार नसेल तर हे कारखाने कायमचे बंद पाडण्याचे काम आता भारतच करेल, असा स्पष्ट संदेशच जागतिक समुदायास आपल्या कणखर कृतीने दिला आहे असा अन्वयार्थ यातून काढता येईल. पाकिस्तानात खोलवर घुसून पाच बड्या दहशतवाद्यांसह त्यांच्या शंभरेक साथीदारांना ठार मारून भारताने आपण काय करू शकतो हेच स्पष्टपणे जगाला दाखवून तर दिले आहेच, पण त्याचबरोबर आता एखादीही दहशतवादी घटना युद्धासाठी आम्हाला प्रवृत्त करील असाही रोखठोक इशारा दिला गेल्याने पाकिस्तानी लष्करास, दहशतवाद्यांना दूध पाजण्याआधी शंभरवेळा विचार करावा लागेल. पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांचे नऊ प्रमुख अड्डे पुरते नेस्तनाबूत करणे हे काही दिसते तेवढे साधेसोपे काम नव्हते. अर्थात तेथील असे सगळेच अड्डे भारतीय लष्कराच्या रडारवर असल्याने पाकिस्तानला त्या आघाडीवर सध्या नमते घेण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नव्हता. जम्मू आणि काश्मीरमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी सगळे प्रयत्न केंद्रातील सरकारकडून होत असताना दहशतवादी कारवायांनी त्यास सुरूंग लावण्याचा पाकिस्तानचा प्रयास आता थांबेल, अशी आशा बाळगता येणार असली तरी त्यांच्यावर भरवसा ठेवणेही धोक्याचे ठरेल. 'ऑपरेशन सिंदूर' त्यासाठी जारीच ठेवावे लागेल.
- वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)
मो. ९८२३१९६३५९