महाजन कायद्यातील कलम २ रद्द करणे सर्वांच्या हिताचे

महाजन कायद्यातील कलम नंबर २ रद्द केले तर कोणाचेच नुकसान होणार नाही, अन्याय होणार नाही. त्यामुळे महाजन कायद्यात तातडीने दुरुस्ती करून महाजन कायद्यातील कलम नंबर २ रद्द करणे सर्वांच्या हिताचे आहे.

Story: विचारचक्र |
17 hours ago
महाजन कायद्यातील कलम २ रद्द करणे सर्वांच्या हिताचे

शिरगाव येथील श्री देवी लईराई जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक निष्पाप लोकांचे बळी गेल्याने गोव्यातील जत्रोत्सव आणि तथाकथित ‘महाजनां’मधील भांडणे यावर सध्या प्रसार माध्यमे आणि  वर्तमानपत्रांतून धडाकेबाज चर्चा चालू आहे. या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे आणि अशा घटना भविष्यात घडू नये म्हणून कोणत्या उपाययोजना करायच्या, याचा अहवाल लवकरच सरकारला मिळेल. देवस्थानाचा विषय हा धार्मिक विषय असल्याने कोणताही सरकारी अधिकारी स्पष्टवक्ता ठरू शकणार नाही.

पोर्तुगीजांनी तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी हे प्रांत काबीज करून मोठ्या प्रमाणात सक्तीचे धर्मांतरण सुरू केल्यानंतर काही सारस्वतांनी धर्मांतर केले व इतरांनी आपल्या देवाला घेऊन पलायन केले. सौदेकर महाराजांच्या ताब्यात असलेल्या फोंडा महालात आपल्या देशासोबत त्यांनी आसरा घेतला. पुढे धर्मांतरण बंद झाल्याने पोर्तुगीज सरकारने महाजन कायदा आणून जुन्या काबिजाद आणि नव्या काबिजादीमधील हिंदू मंदिरांवर काही प्रमाणात तरी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले.

पोर्तुगीज भाषा शिकून प्रशासनात सहभागी झालेल्या लोकांनीच हा कायदा तयार केला असणार, अन्यथा सदर कायद्याचे माजानिया (महाजन) कायदा असे नामकरण झालेच नसते. सदर कायद्याचा मसुदा एखाद्या पोर्तुगीज अधिकाऱ्याने तयार केला असता तर महाजन ऐवजी सदस्य हाच शब्द सदर कायद्यात आला असता. पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सदर कायदा तयार केला असता तर त्यांनी स्थानिक  लोकांना देवस्थानांचे सदस्य करून घेतले असते. ज्या कोणी सदर कायद्याचा मसुदा तयार केला, त्यांनी ज्या लोकांनी मंदिर स्थापन केले त्यांचे थेट नातेवाईकच भविष्यात सदस्य होऊ शकतील, अशी तरतूद सदर कायद्यात केली आहे. या एका तरतुदीमुळे हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानची निवडणूक गेली कित्येक वर्षे झालेली नाही. डिचोलीचे मामलेदार हरवळे देवस्थानचे प्रशासक आहेत, पण प्रत्यक्षात १६ वर्षांपूर्वी निवडलेली देवस्थान समितीच देवस्थानचा दैनंदिन कारभार सांभाळीत आहे. श्री रुद्रेश्वर देवस्थानची जी सरकार दरबारी नोंद असलेली नियमावली आहे; त्यानुसार गोव्यातील कोणीही भंडारी श्री रुद्रेश्वर देवस्थानचा महाजन बनू शकतो. या देवस्थानचे एक माजी अध्यक्ष पोलीस अधिकारी होते. सदर अधिकारी पेडणे येथे असताना कासकर आडनाव असलेल्या एका हुशार व कर्तबगार तरुणाची त्यांच्याशी ओळख झाली. कासकर आडनाव भंडारी समाजातही असल्याने हा कासकर भंडारी समाजाचाच असणार असे वाटल्याने रुद्रेश्वर देवस्थानचा सदस्य केला. ही गोष्ट एका जागृत महाजनच्या निदर्शनास येताच त्यांनी महाजन यादीला उच्च  न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्यांची हरकत ग्राह्य धरून रुद्रेश्वर देवस्थानच्या सर्व महाजनांच्या यादीची छाननी करण्यासाठी लवादाची नियुक्ती केली आहे. हे काम अजून पूर्ण न  झाल्याने निवडणूक होत नाही.

श्री रुद्रेश्वर मंदिराची ज्या लोकांनी सरकार दरबारी नोंदणी केली, त्यांनी जी नियमावली तयार केली त्यात भंडारी समाजातील कोणीही सज्ञान व्यक्ती महाजन होऊ शकतो. नियमावलीपेक्षा कायदा श्रेष्ठ ठरतो. त्यामुळे रुद्रेश्वर देवस्थानची नियमावली दुय्यम ठरली आहे. श्री रुद्रेश्वर देवस्थानची नोंदणी करताना सह्या केलेल्या लोकांशी रक्ताचा कोणताही संबंध नसलेल्या भंडारी समाजातील असंख्य लोकांनी अर्ज करून महाजनपद मिळवले होते. किंबहुना देवस्थान समितीने सदस्य नोंदणी मोहीम हाती घेऊन नवे महाजन नोंद केले होते. उच्च न्यायालयाच्या सदर आदेशानुसार या सर्व सदस्यांचे महाजनपद रद्दबातल झाल्यातच जमा आहे. ‌श्री रुद्रेश्वर देवस्थान समिती व इतरांनी अलिकडेच रथयात्रा काढली होती. गोवाभरातील भंडारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने महाजन म्हणून नोंदणी करावी असे आवाहन अस्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकांना केले. या आवाहनानुसार उद्या लोकांनी अर्ज केले तर त्यांना सदस्यत्व मिळेल काय? उत्तर नाही असेच आहे. जुन्या समित्यांनी ज्यांना सदस्यत्व दिले होते, ते सर्व सदस्य सध्या अधांतरी हेलकावे खात आहेत. गणू वस्त यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात नेले व त्यामुळे शेकडो भंडारी बांधवांचे सदस्यत्व रद्द झाले, असे सर्वसामान्य जनतेला वाटते. वस्त यांनी आपली उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतल्यास हा प्रश्न सुटू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ही समस्या सुटावी म्हणून भंडारी समाजाचे नेते रवी नाईक यांनी ७-८ वर्षांपूर्वी पणजीतील फिदाल्गो हॉटेलात भंडारी नेत्यांची एक मोठी बैठक बोलावली होती. त्या बैठकीचे मला निमंत्रण होते. त्यामुळे भंडारी समाजाचा मी नेता आहे, असा गोड गैरसमज मी करून घेतला होता.

हरवळे येथील श्री रूद्रेश्वर देवस्थानच्या महाजनांबाबत गेली कित्येक वर्षे जो घोळ चालू आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी महाजन कायद्यातील कलम नंबर २ गाळणे, हा सर्वोत्तम मार्ग आहे. एक श्री रुद्रेश्वर देवस्थान वगळल्यास इतर कुठल्याच देवस्थानात महाजन म्हणजेच सदस्यत्वाबाबत वाद असल्याचे माझ्या वाचनात आलेले नाही. गोव्यातील सर्व मोठ्या व प्रसिद्ध देवस्थानचे महाजन हे मुख्यत्वे सारस्वत आहेत. कुंकुळ्ळी व फातर्पे परिसरातील सर्व देवस्थानांचे महाजन हे मराठा समाजाचे आहेत. आम्हाला महाजन करा, अशी मागणी इतर समाजातील कोणीच केलेली नाही. धारगळ येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचे महाजन हे म्हापसा येथील वैश्य समाजातील  आहेत. जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानात मडगाव येथील सारस्वत मंडळी महाजन आहेत. तेथेही महाजनपदाबाबत कोणताही वाद नाही. शिरगाव येथील श्री लईराई देवीचे धोंड सर्व समाजातील असले तरी महाजन मात्र मुख्यत्वे भंडारी समाजाचेच आहेत. एक हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थान सोडले तर इतर कुठल्याही देवस्थानात महाजनपदाबाबत कोणताच वाद नाही. हरवळे देवस्थानची ज्यांनी नोंदणी केली, ते भंडारी बांधव खरोखरच उदारमतवादी होते. त्यामुळेच त्यांनी श्री रुद्रेश्वर देवस्थानचे सदस्यत्व केवळ गोव्यातीलच नव्हे तर शेजारच्या राज्यातील भंडारी बांधवांनाही खुले ठेवले होते. ही तरतूद महाजन कायद्यातील कलम २ च्या नेमकी विरोधी आहे. श्री रुद्रेश्वर देवस्थानची नियमावली अधिक उदारमतवादी आणि मानवतावादी दिसते. त्याउलट महाजन कायद्यातील कलम नंबर २ संकुचितवादी दिसते. देवस्थानचे महाजन कोण होऊ  शकतात यावर सदर कलम नियंत्रण घालते. त्यामुळे सदर कलम महाजन कायद्यातून वगळण्याची गरज आहे. गोव्यातील सर्व देवस्थानचे महाजन कोणी व्हावे, हे प्रत्येक देवस्थानने आपल्या नियमावलीत निश्चित केलेले आहे. त्यामुळे कोणत्याही देवस्थानात वाद होत नाही. महाजन कायद्यातील कलम नंबर २ रद्द केले तर कोणाचेच नुकसान होणार नाही, अन्याय होणार नाही. त्यामुळे महाजन कायद्यात तातडीने दुरुस्ती करून महाजन कायद्यातील कलम नंबर २ रद्द करणे सर्वांच्या हिताचे आहे.


गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)