जेव्हा चालत्या रेल्वेतून केंद्रीय मंत्रीच गायब होतात..

Story: राज्यरंग |
17 hours ago
जेव्हा चालत्या रेल्वेतून केंद्रीय मंत्रीच गायब होतात..

रेल्वेचा प्रवास आरामदायी असल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बहुतेक लोक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. असे असले तरी काही वेळा रेल्वेचा प्रवास धोकादायकही ठरतो. विशेषकरून गाडी स्टेशनवर थांबली असताना आपण खाद्यपदार्थ वा पाणी आणण्यासाठी खाली उतरतो आणि तितक्यात गाडी सुटते. धावती गाडी पकडणे कठीण असते. ही सर्कस जीवावरही बेतू शकते. एका केंद्रीय मंत्र्यांना सुटलेली गाडी पकडताना प्लाटफॉर्मवर पडल्याने गंभीर दुखापत झाली. गाडी मंत्र्यांना न घेताच धावू लागली. मंत्रिमहोदय आपल्या बर्थवर नाहीत, हे समजल्यावर मात्र रेल्वे पोलिसांसह दिल्ली ते जबलपूरपर्यंत एकच धावपळ उडाली. अखेर तीन तासांनंतर मंत्रिमहोदय दुसऱ्या रेल्वेमध्ये सुखरूप असल्याचे समजले आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला. 

दिल्लीहून शनिवारी रात्री केंद्रीय मंत्री जुएल उरांव गोंडवाना एक्स्प्रेसने जबलपूरला येत होते. पहाटे ३.४५ वा. मंत्री दमोह स्टेशनवर उतरले होते. त्याच वेळी त्यांची ‘शुगर लो’ झाली. त्यांना चालणे कठीण होऊ लागले आणि गाडी सुरू झाली. रेल्वेमध्ये चढत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते प्लॅटफॉर्मवरच पडले. त्यांना दुखापत झाली. याच दरम्यान दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ‘संपर्क क्रांती’ एक्स्प्रेस आली होती. मंत्रिमहोदय त्या गाडीत जाऊन बसले. रविवारी सकाळी त्यांची बर्थ रिकामी आढळली. ही बातमी कळताच खळबळ उडाली. त्यांच्या स्टाफने वेळ न दवडता त्यांचा शोध सुरू केला. तीन तास रेल्वे आणि रुळावर त्यांचा शोध घेण्यात आला. अखेर ते सकाळी ६.५५ वाजता १६२ किलोमीटर दूर सिहोरा स्टेशनवर (जबलपूर) ‘संपर्क क्रांती’ एक्स्प्रेसच्या कोच बी ३ च्या बर्थ ५७ वर सापडले. त्यांच्या हातापायांवर जखमेचे व्रण होते. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना जबलपूरला आणण्यात आले.

उरांव ओडिशाच्या सुंदरगड मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री आहेत. त्यांचा जन्म सुंदरगड जिल्ह्यात गरीब आदिवासी कुटुंबात झाला. १९८९ मध्ये ते भाजपात दाखल झाले आणि त्यांचे राजकीय जीवन सुरू झाले. १९९० साली बोनाई विधानसभा मतदारसंघात विजयाची पताका फडकवून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९८ मध्ये ते सुंदरगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. १९९९ साली तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांच्याकडे आदिवासी व्यवहार मंत्रिपद सोपवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात उरांव यांच्याकडे आदिवासी कल्याण मंत्रिपदाची जबाबदारी होती. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातही उरांव आदिवासी कल्याण मंत्रिपदच भूषवत आहेत.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)