चोर्ला गावात हलतरा नदीच्या किनारी सातेरी केळबाय, बेताळ यांची मंदिरे आहेत. त्यांच्या उपलब्ध जीर्ण अवशेषांद्वारे बदामी, चालुक्य, गोवा कदंब, विजयनगर, सावंत भोसले, जांबोटकर, सरदेसाई आदी राजकारण्यांशी निगडित इतिहासाच्या असंख्य खुणा विखुरलेल्या पाहायला मिळतात.
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमांवर दख्खनचे विस्तीर्ण पठार जेथे निरोप घेण्याच्या मार्गावर असते, तेथेच वसलेला चोर्ला गाव म्हणजे सांस्कृतिक, पर्यावरणीय नैसर्गिक वैभवाचा मुकुटमणी ठरला होता. ऐतिहासिक दख्खनच्या पठाराचे शेवटचे टोक म्हणून गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारे चोर्लाचे विस्तीर्ण पठार निसर्ग पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. उट्रीक्युलारिया, इरियोकॉलन, ड्रोसेरा, आर्किड, लिलीच्या विविध वनस्पतींच्या प्रजाती, बुटकी झुडपे, तृणपाती, रानफुले यांनी चोर्लाचे पठार समृद्ध आहे. चोर्ला गावातील हे पठार दर्शनी पाहायला जरी निर्जीव जांभ्या दगडांनी युक्त असले, तरी वर्षाचे बारा महिने तेथे विविध प्रकारची तृणपाती, आमरी झुडपे आणि अन्य वनस्पतींच्या प्रजाती तग धरतात आणि त्याच्यावर गुजराण करणारी फुलपाखरे, पतंग, कृमिकिटक आणि अन्य प्रकारचे वन्यजीव जगतात. त्या पठारावर असलेले तळे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरते आणि श्रावण, भाद्रपदात अंपोनोजेटी नाटेशीसारख्या प्रदेशनिष्ट असणाऱ्या जलपर्णीसाठी जीवनधार ठरते. तऱ्हेतऱ्हचे मासे, बेडूक, जलचर, उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी हे तळे उपयुक्त ठरत असते. पूर्वीच्या काळी याच तळ्याच्या परिसरातल्या सुर्ला आणि चोर्ला गावातील कष्टकरी श्रावणात उपलब्ध मातीचा उपयोग करून मातीच्या घराना रंगरंगोटी करायचे आणि मृण्मयी गणपती मूर्तीच्या वर घरी जी माटोळी बांधली जायची तिला सजवण्यासाठी मोसमी फळे, फुले या पठाराच्या वृक्षवेलींद्वारे त्यांना प्राप्त व्हायची. चोर्ला, सुर्ला आणि हिवरे खुर्द या गावांशी संलग्न हे पठार ‘तळवाचो सडो’ म्हणून लोकमानसात ओळखले जाते.
आज तळवाच्या सड्यावर जंगली वृक्षवेली, झुडपे यांचे प्रस्थ असून पूर्वीच्या काळी येथे मानवी समाजाचे वास्तव्य असल्याच्या आठवणी जुनीजाणती मंडळी सांगतात. समुद्रसपाटीपासून ८०० मीटरपेक्षा जास्त उंचावर वसलेले चोर्ला गाव आज तिन्ही राज्यांच्या सीमेवर अतुलनीय सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक संबंध प्रामुख्याने सत्तरी या गोव्यातल्या आणि मांगेली या दोडामार्ग महाराष्ट्रातल्या तालुक्यांशी सांभाळून आहे. आज सत्तरी केरीतून बांधलेल्या चोर्ला घाट रस्त्यामुळे एकेकाळी दुर्गम गणला जाणारा हा गाव गोव्याशी अधिक जवळ झालेला आहे. प्राचीन काळी जुन्या घाटमार्गातला हा गाव गोवा, कोकणात ये-जा करणाऱ्या व्यापारी, प्रवासी यात्रेकरू यांच्यासाठी व्यापार उद्योग आणि देवाणघेवाण करण्यास महत्त्वाचा दुवा ठरला होता. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सत्तरी हा गोव्यातला चोर्ला गावाच्या शेजारी असलेला तालुका पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला, तर जांबोटीतल्या सरदेसाईंचे संस्थान ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आल्यानंतर दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर वसलेल्या चोर्ला गावचे राजकीय, भौगोलिक महत्त्व वृद्धिंगत झाले होते. चोर्ला गावात थोरला, आंबोली, तळवाचो आणि चनन असे चार महत्त्वाचे जांभ्या दगडांनी युक्त असलेले सडे असले, तरी जुन्या काळी पायदळ, घोडदळाच्या सैन्यासाठी युद्धभूमीच्या रूपात उपयुक्त ठरले होते. त्यांच्या भोवताली असणाऱ्या लासनी टेंब, निवळ टेंब आणि कुंबळी टेंबासारख्या उंचवट्याचा वापर टेहळणीसाठी केला जायचा. जांभ्या दगडाने युक्त असलेले हे सडे धुवाधार कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याला झेलून कांडूचा पाट, केगदीचा पाट, चोरवेस नदी, तिट्यांची नदी, हलतरा नदीत वळवतात. त्यामुळे वज्रासकला, गुळमाचो, अगवाचो, विर्डीची आणि आडिवणेचो हे धबधबे निसर्गप्रेमींसाठी आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करणारे स्रोत ठरले. चोर्ला गावातल्या पठारावरून प्रवाहित होणारे हे पाणी सुर्ला कळसाद्वारे नानोडा तळ्याशी एकरूप होऊन म्हादईला सशक्त करते, तर महाराष्ट्राच्या कड्यावरून कोसळणारे मांगेली धबधब्याचे पाणी भेडशी परिसरात ऊर्जा प्रदान करते. चोर्ला गावात हलतरा नदीच्या किनारी सातेरी केळबाय, बेताळ यांची मंदिरे आहेत. त्यांच्या उपलब्ध जीर्ण अवशेषांद्वारे बदामी, चालुक्य, गोवा कदंब, विजयनगर, सावंत भोसले, जांबोटकर, सरदेसाई आदी राजकारण्यांशी निगडित इतिहासाच्या असंख्य खुणा पाहायला मिळतात. आजचा चोर्ला गाव सातेरी केळबाय आणि रामेश्वराच्या मंदिराच्या परिसरात नावारूपाला आलेला असला, तरी गेल्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची जी संचिते इथल्या स्थळनामात, पाषाणी मूर्ती, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलूंत आढळत आहे, त्यावरून ३७२३.९४ हेक्टरात वसलेल्या या गावाच्या गतवैभवाची कल्पना येऊन थक्क व्हायला होते.
खेम सावंत भोसले, शुजाअत शहमतपनाह यांनी लिहिलेल्या पत्रात १६८९ साली चोर्ला घाटाचा उल्लेख आढळतो. सडे हे ठाणे मराठ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. सावंतवाडी संस्थानच्या सरहद्दीवर वसलेल्या या ठाण्याचा कारभार तेथील देसाईंकडे होता. १७८५ सली म्हैसूर संस्थानच्या टिपू सुलतानाने चार दिवस लढाई करून जांबोटी घेतल्यावर सड्यावर ताबा मिळवला आणि त्यामुळे तेथील संस्थानिक आपल्या बायका-मुलांसह आश्रयासाठी केरी-सत्तरीत गेले. सड्याच्या बंदोबस्तासाठी जिवाजी गोपाळ याची नेमणूक मराठ्यांनी केली. ९ जून १७८५ रोजी सडेकर देसाईने सडा पुन्हा जिंकून घेतल्याचे संदर्भ आढळतात. खानापूरचे लखम गौडा पाटील, जांबोटीचे वेंकटराव सरदेसाई यांच्या कारकिर्दीत सड्याच्या किल्ल्याचे उल्लेख सापडतात.
सडा गावात मध्ययुगीन इतिहासाशी नाते सांगणाऱ्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण विहिरी आहेत, त्यांची संख्या, जीर्ण अवशेष ५० वर्षांपूर्वीच्या गतवैभवाची साक्ष देतात. जुन्या काळी हलतरा नदीच्या उजव्या काठावर असलेले रामेश्वराचे मंदिर एक सहस्त्रपेक्षा जास्त काळाच्या इतिहासाची साक्ष देत आहे. मंदिराचा जुन्या शैलीतला गर्भगृहाशी संलग्न सभामंडप, त्या परिसरात मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या काळ्या पाषाणाचा वापर कल्पकतेने करून समूर्त केलेली एकंदर वास्तूरचना, शिवलिंगासमोर अासनस्त नंदीची सुबक पाषाणी मूर्ती याद्वारे हे मंदिर किती शतके जुने आहे, याची कल्पना येते. श्री रामेश्वराच्या मंदिराची उभारणी करताना वास्तू विशारदाने चंद्रसूर्य तारका मंडळ यांच्या आकाश स्थितीचा विचार केला होता आणि त्यामुळे वर्षातील विशिष्ट तिथीला सूर्याची किरणे शिवलिंगावर पडतात. महिषासुरमर्दिनी रूपातील सातेरी, गजलक्ष्मी रुपातील केळबाय, व्यापारी मार्गातील अरिष्टांना दूर करणारा बेताळ अशी ज्या एकापेक्षा एक सुबक पाषाणी मूर्ती पाहायला मिळतात, त्यातून चोर्लाच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची प्रचिती येते. चोर्ला येथे मंदिराबाहेर उघड्यावर गजलक्ष्मीची जी सुंदर मूर्ती आढळली आहे, तिच्यावर एका बाजूला इथे सातेरीच्या रूपात पुजल्या जाणाऱ्या महिषासुरमर्दिनीचे चित्रण करून दोन्ही देवत्वांचा जणू समन्वय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.