१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धापूर्वी भारतात मॉकड्रिल झाली होती. ते युद्ध व्हायच्या तीन चार दिवस आधी मॉकड्रिल झाली होती. सध्या मॉकड्रिल, ब्लॅकआऊट आणि सायरन वाजवून सतर्क करण्याचा सराव करण्यासाठी केंद्राने आदेश जारी केला आहे, त्यावरून भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध होण्याची शक्यता आपोआप बळावते.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने चालवलेल्या प्रयत्नांचे रूपांतर युद्ध पुकारण्याच्या स्थितीपर्यंत पोहचू शकते, अशी सध्याची देशातील स्थिती आहे. भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना वारंवार पाकिस्तान आश्रय देत असल्यामुळे या मुद्द्यावरूनच पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा असे सर्वसामान्यांनाही अपेक्षित आहे. एका बाजूने देशाच्या संरक्षण दलांकडून बैठका, तयारी, युद्ध सराव सुरू असताना दुसऱ्या बाजूला मोफत मिळालेल्या समाजमाध्यमांवर बरेच लोक आपण युद्धासाठीच तयार असल्याचे दाखवत आहेत. असे असले तरी देशाच्या संरक्षण दलांनी याबाबत कुठलीच घाई केलेली नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर शेकडो पाकिस्तानी नागरिक भारत सोडून गेले. पाकिस्तानमधील उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनाही भारताने माघारी बोलावले. पाकिस्तानशी असलेला सिंधू जल करार स्थगित केला. हा जल करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे दाद मागितली, पण तिथेही पाकिस्तानची डाळ शिजलेली नाही. भारताकडून पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. प्रसंगी युद्धासाठी मदत मिळवण्यासाठीही अनेक मित्र देशांसोबत भारताने चर्चा सुरू केली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला पंधरा दिवस उलटून गेले. या कालावधीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतानाच भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू खंबीरपणे मांडली. गेले पंधरा दिवस केंद्र सरकारने विरोधी पक्षांचे नेते, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, मंत्रिमंडळ, सुरक्षेचे व्यवहार पाहणाऱ्या मंत्र्यांच्या बैठका, सुरक्षा दलांच्या बैठका घेऊन वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. रोज काही ना काही घडामोडी होतच आहेत. त्यातच केंद्र सरकारने देशातील अनेक राज्यांना नागरिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या युद्ध सरावाचे आदेश दिले. बुधवारी ७ मे रोजी देशातील ३५ राज्ये आणि संघ प्रदेशांमध्ये एकाच दिवशी २५९ ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे. तीन पद्धतीच्या मॉकड्रिलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना युद्धप्रसंगी घ्यायची दक्षता या विषयी माहिती दिली जाईल आणि सराव करून घेतला जाईल. उत्तर गोव्यात पणजी आणि दक्षिण गोव्यात मुरगाव तालुक्यातील वास्को, दाबोळी आणि हार्बर परिसरात मॉकड्रिल होतील. ही तयारी पाहता भारत पाकिस्तानसोबतच्या युद्धाचीच तयारी करत असल्याचे सर्वसामान्यांचे मत झाले आहे. काही उतावीळवीरांनी समाजमाध्यमांवर तर युद्धाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. हा विषय जेवढा नाजूक तेवढाच देशाच्या संरक्षणाचा, नागिरकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी भारताने आणि संरक्षण दलांनी जसा संयम दाखवला तसाच संयम नागरिकांनीही दाखवावा लागेल.
बुधवारच्या मॉकड्रिलमधून युद्धप्रसंगी आपत्कालीन व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे, स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षेची खबरदारी कशी घ्यावी, याबाबत एका अर्थाने प्रशिक्षण दिले जाईल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. युद्धजन्य स्थितीत कुठलीही परिस्थिती आपल्याभोवती उद्भवू शकते. अशा वेळी नागरिकांनी काय करावे, याचा संदेश या मॉकड्रिलमधून दिला जाणार आहे. यापूर्वी १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धापूर्वी भारतात मॉकड्रिल झाली होती. ते युद्ध व्हायच्या तीन चार दिवस आधी मॉकड्रिल झाली होती. त्यावेळी आजच्यासारख्या माध्यमांच्या सुविधा नव्हत्या. पण त्यावेळच्या नागरी सरावानंतर लगेच युद्ध सुरू झाले. त्यामुळे सध्या जो २४४ जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल, ब्लॅकआऊट आणि सायरन वाजवून सतर्क करण्याचा सराव करण्यासाठी केंद्राने आदेश जारी केला आहे, त्यावरून भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध होण्याची शक्यता आपोआप बळावते. पुढील काही दिवसांतच याची सुरुवातही होऊ शकते, असे अंदाज बांधले जात आहेत. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य आहे. भारत-पाक सीमेनजीकच्या क्षेत्रासह समुद्र किनारी असलेल्या राज्यांमध्ये, संरक्षण दलाच्या वेगवेगळ्या विभागांचे तळ असलेल्या राज्यांमध्ये अशा एकूण २५९ ठिकाणी सराव होणार आहे. नागरिक म्हणून आपण सर्वांनीच या मॉकड्रिलमधून काही गोष्टी शिकाव्या लागतील. विशेष म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवता कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम होण्यासाठी मानसिक तयारी करावी लागेल. युद्ध होणार म्हणजे हुरळून न जाता जबाबदारीने वागण्याचे भानही ठेवावे लागेल. ज्या जेशांमध्ये युद्धे होतात ती फक्त दोन देशांच्या संरक्षण दलांमधीलच युद्धे नसतात, तर त्या देशांतील नागरिकांच्या कसोटीचा काळ पाहणारीही असतात. त्यामुळेच देशात कुठलीही स्थिती उद्भवली तरी नागरिकांनी सर्वांच्या सुरक्षेसाठी योग्य ती दक्षता घ्यावी आणि सर्वांनीच जबाबदारीने वागावे.