भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांची पात्रता कळली असेल तर युद्धाची स्थिती उद्भवणार नाही. पण पाकिस्तानने कुठलीही प्रखर प्रतिक्रिया देण्याचा विचार केला तर भारतीय सैन्य त्याला योग्य धडा शिकवेल.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर १.२८ वाजताच्या दरम्यान भारतीय लष्कराच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ पडतो, ज्यात शत्रूला शोधून काढण्याचा इशारा देणारा आणि 'हल्ला करण्यासाठी तयार, जिंकण्यासाठी प्रशिक्षित' अशा प्रकारचा संदेश दिला जातो. त्याच दरम्यान भारताची विमाने पाकिस्तानात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून परतीच्या मार्गावर असतात. त्यानंतर लगेच १.५१ ला 'ऑपरेशन सिंदूर'चा पोस्ट येतो. 'जस्टिस सर्व्हड्' जय हिंद! असे सांगून काम फत्ते झाल्याची माहिती जगाला दिली जाते. बुधवार उजाडेपर्यंत भारताने पाकिस्तानातील नऊ जागांवर हल्ले करून अतिरेक्यांची निवासस्थाने बेचिराख केल्याच्या बातम्या जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये झळकून कोट्यवधी लोकांनी त्या पाहिलेल्या असतात, चर्चा सुरू झालेली असते. भारताच्या कृतीचे पूर्ण समर्थन करत भारतीयांकडून अभिमानाने लष्कराचे कौतुक सुरू होते. भारताने गेल्या काही वर्षांत पाकिस्तानला वेळोवेळी प्रत्युत्तर दिले. पण या वेळचे प्रत्युत्तर काही वेगळे होते. ज्या पर्यटकांना पहलगाममध्ये गोळ्या घालण्यात आल्या, त्यात भारतातील काही भगिनींना विधवा करण्यात आले. दहशतवाद्यांनी काहीजणांना मोदींना जाऊन सांगा म्हणून सोडून दिले होते. ज्या पर्यटकांना ठार केले, त्यात एक नवविवाहित लष्करी अधिकारीही होता. भगिनींना विधवा करण्याच्या या कृतीला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे तळ बेचिराख करताना भारतीय लष्कराने आपण देशातील प्रत्येक भगिनीच्या रक्षणासाठी तत्पर आहोत, असे शत्रूंना दाखवून दिले आहे. भारताने सिंदूरची किंमत काय असते ते पाकिस्तानला दाखवून दिले. भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान पूर्णपणे हादरले. पाकिस्तानच्या सीमेत घुसून भारताने दिलेल्या दणक्यातून सावरणेही पाकिस्तानला शक्य झालेले नाही. भारताची पाच विमाने पाडली वगैरे वल्गना पाकिस्तानने सुरू केल्या. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या आणि आपल्या देशात त्यांचे अड्डे चालवण्यासाठी राजाश्रय देणाऱ्या पाकिस्तानने यातून धडा घेऊन दहशतवाद्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची सोडून उलट भारतालाच दूषण देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने वेळीच सावध होऊन भारताला दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी मदत केली नाही तर हाच दहशतवाद पाकिस्तानला जेरीस आणणार आहे. पाकिस्तानच्या मातीत पोसल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांची जाणीव जगातील सर्वच देशांना आहे. त्यामुळे रडून सहानुभूती मिळवण्याच्या नादात पाकिस्तानने आपल्या अस्तित्वावर कुऱ्हाड मारून घेऊ नये. पण भारताने केलेल्या हल्ल्यानंतर ज्या प्रकारची विधाने पाकिस्तानकडून आली, ते पाहता पाकिस्तान सुधारण्याची शक्यताच नाही. राजकीय दारिद्र्यासोबत तिथे असलेले आर्थिक दारिद्र्य हे पाकिस्तानने आपल्यावर ओढवून घेतलेले आहे. शिक्षण, समानता, मनुष्य विकास यावर विश्वास नसलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या तालावर नाचण्यापेक्षा देशाची स्थिती सुधारण्यावर भर दिला असता तर एव्हाना दहशतवाद्यांचा खात्मा झाला असता. भारताने दिलेले प्रत्युत्तर पाहून पाकिस्तानने स्वतःला सावरले नाही तर भारत पाकिस्तानला कालच्या हल्ल्यापेक्षाही मोठा धडा शिकवू शकतो. विनाशाकडे जाण्यापेक्षा भारताचा सामना करण्याची कुवत आपल्या लष्करात नाही याची जाणीव पाकिस्तानने करून घेतली नाही तर पुढील काही दिवसात भारतीय लष्कर त्यांना त्यांची पात्रता दाखवेल.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर केवळ पंचवीस मिनिटात भारताने दशतवाद्यांच्या पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर हल्ले करून तळ नेस्तनाबूत करण्यात आले. भारतीय लष्कराने तिथे नागरिक किंवा लष्करी तळांना लक्ष्य केले नाही, हे हल्ल्यानंतर त्वरित भारताने स्पष्ट केले. हा हल्ला फक्त दहशतवाद्यांना संपविण्यासाठी होता. दहशतवाद्यांवर होता. त्यांच्या साधनसुविधांवर होता. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा यासारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांना हेरून भारताने ती उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ले केले. पाकिस्तान आणि पाकिस्तानचा ताबा असलेल्या काश्मीरमधील एकूण नऊ ठिकाणी हे हल्ले झाले. सत्तरपेक्षा जास्त दहशतवाद्यांना या हल्ल्यात ठार करण्यात आल्याचे म्हटले जाते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडूनही काही दावे केले जात आहेत, पण त्यांच्या दाव्यांमध्ये तथ्य नाही. भारतीय विमाने पाकिस्तानमध्ये घुसून तिथे दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करून परतल्यानंतर भारताची विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला असला तरी त्यात तथ्य नाही. भारताने विचारपूर्वक आणि पूर्ण तयारीनेच हा हल्ला केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या हल्ल्यावेळी स्वतः आढावा घेत होते. भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटनने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. दहशतवादाचा फटका बसलेल्या देशांकडून भारताच्या कृतीचे समर्थन व्हायला हवे. ते जाहीरपणे नसले तरीही अशा देशांकडून पाकिस्तानची पाठराखण होणार नाही असे अपेक्षित आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांची पात्रता कळली असेल तर युद्धाची स्थिती उद्भवणार नाही. पण पाकिस्तानने कुठलीही प्रखर प्रतिक्रिया देण्याचा विचार केला तर भारतीय सैन्य त्याला योग्य धडा शिकवेल.