विरोधकांच्या भांडणाचे परिणाम काय?

भाजपला या निवडणुकीत मोठा फायदा झाला तर तो त्यांच्या रणनीतीमुळे आणि मित्र पक्षांसोबत केलेल्या युतीमुळे असेल. विरोधकांचे नुकसान झाले तर त्याला विरोधकांमधील मतभेद कारणीभूत असतील. निकालानंतरच युतीचे फायदे-तोटे लक्षात येतील. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल.

Story: संपादकीय |
11th December, 12:09 am
विरोधकांच्या भांडणाचे परिणाम काय?

जिल्हा पंचायत निवडणुसाठी मतदान २० डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी दोन्ही जिल्हा पंचायतींच्या ५० जागांसाठी ३२० अर्ज ग्राह्य धरले आहेत. उत्तर गोव्यातील २५ जागांसाठी १५८ तर दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायतींच्या २५ जागांसाठी १६२ अर्ज ग्राह्य धरले आहेत. गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्यामुळे त्या दिवशी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात, ते स्पष्ट होईल. सध्यातरी भाजप, काँग्रेस, आरजीपी, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, मगो, राष्ट्रवादी यांच्यासह अपक्ष आणि इतर काही पक्षांचे उमेदवार निवडणुकीत आपले भवितव्य आजमावत आहेत. गेल्या काही निवडणुकीत जिल्हा पंचायत भाजपकडेच आहे. मागील निवडणुकीतही भाजपला दोन्ही ठिकाणी चांगल्या जागा मिळाल्या होत्या. २०१२ पासून भाजपची सत्ता राज्यात सलगपणे असल्यामुळे सरकारविरोधी असंतोष मोठ्या प्रमाणात आहे, असे मानले जाते. त्यामुळेच भाजपच्या विरोधात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीसारखे समविचारी पक्ष एकत्र येणार आहेत, अशी चर्चा बरेच दिवस रंगली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या तिन्ही पक्षांचे नेते हातात हात घेऊन आपण एकत्र येणार, असे लोकांना भासवत होते. प्रत्यक्षात ते एकत्र आले नाहीत. या पक्षांमध्ये फलदायी चर्चा झाली नाही, त्यामुळे युती होऊ शकली नाही. काँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड पक्षांच्या नेत्यांच्या दोन ते तीन बैठका झाल्या, पण यात जागा वाटपावर एकमत न झाल्यामुळे चर्चा फिस्कटली. शेवटचा प्रयत्न म्हणून दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे गोव्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीतही बैठक झाली, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. शेवटी युती तुटल्याचे सगळ्या पक्षांनी जाहीर केले. आता फक्त काँग्रेस, गोवा फॉरवर्डची युती झाली आहे, असे या पक्षांनी जाहीर केले. आरजीपी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधी जिल्हा पंचायत निवडणूक होत आहे. राज्यात सध्या सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शह देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे हाच सध्या पर्याय होता. भाजपला टक्कर देणे, आता एका पक्षाला शक्य नाही. कारण सध्या भाजपकडे सर्वाधिक म्हणजे २७ जागा आहेत. भाजपच्या मित्र पक्षांना धरून त्यांच्याकडे ३२ जागा आहेत. फोंड्याची जागा सध्या रिक्त आहे. एकूण चित्र पाहता भाजप इतका बलाढ्य बनल्यामुळे त्याच्या पराभवासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी विरोधातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. पण शेवटपर्यंत काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड वगळता अन्य कोणीच या युतीत आला नाही. आम आदमी पक्ष तर सुरुवातीपासूनच युतीच्या चर्चेपासून दूर राहिला. विरोधकांमध्ये एकमत नसल्यामुळे आणि त्यांनी एकमेकांविरुद्ध मतविभाजनाचा फायदा शेवटी भाजपसारख्या बलाढ्य पक्षालाच होण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडे त्यांच्या कॅडरची ठरलेली मते आहेत. काँग्रेस, आरजीपी यांची मते काही मतदारसंघांत निश्चित असली तरी त्यांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे ती मतेही विभागली जातील. आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्डकडे काही मतदारसंघांत मते आहेत, पण तिथेही विरोधक आमने-सामने असल्यामुळे ती मतेही फुटण्याची शक्यता आहेत. त्यातल्या त्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या युतीचा फायदा या दोन्ही पक्षांना होऊ शकतो. अर्थात या पक्षांची युती झाली नाही, याचा मोठा फायदा भाजपला होणार आहे. शिवाय भाजपने मगोसाठी जागा दिल्या आहेत. काही ठिकाणी अपक्षांना पाठिंबा दिला आहे. विरोधकांमधील भांडणाचा फायदाही भाजपच घेणार आहे.

युती तुटल्यानंतर विरोधक एकमेकांवर भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप करत आहेत. भाटकारशाहीचेही आरोप होत आहेत. हे आरोप विरोधक एकमेकांवर करत असले तरी त्यांच्या मतांच्या विभाजनासाठी हे सगळेच कारणीभूत ठरणार आहेत. तसे झाले तर त्यावेळी एका विरोधी पक्षाला दोष देता येणार नाही. भाजपला या निवडणुकीत मोठा फायदा झाला तर तो त्यांच्या रणनीतीमुळे आणि मित्र पक्षांसोबत केलेल्या युतीमुळे असेल. विरोधकांचे नुकसान झाले तर त्याला विरोधकांमधील मतभेद कारणीभूत असतील. निकालानंतरच युतीचे फायदे-तोटे लक्षात येतील. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असेल.