
पुन्हा एकदा ओंकार हत्ती गोव्याच्या हद्दीतून सिंधुदुर्गात गेला आहे. ३० नोव्हेंबरला ओंकार गोव्यात आला होता. ओंकारने यावेळी तोरसे व आसपासच्या भागात बागायतीचे नुकसान केले. त्याला विविध मार्गांनी पुन्हा सिंधुदुर्गात हाकलण्याची मोहीम वन खात्याने सुरू केली होती.
यापूर्वीच्या वास्तव्यात त्याने तोरसे, तांबोसे, उगवे या भागातील भातशेतीचे बरेच नुकसान केले होते. यावेळी ओंकारने बागायतीवर ताव मारला. काही वाहनांचेही नुकसान केले. मागच्या वेळी ओंकारला पिटाळण्याचे बरेच प्रयत्न झाले, तरीही तो जात नव्हता. त्याला जेरबंद करण्याच्या हालचालीही वन खात्याने सुरू केल्या होत्या. तसेच कर्नाटकात त्याचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबतही वन खात्याच्या मंत्र्यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे चर्चा केली होती. चर्चा झाली, मात्र थोड्याच दिवसात गोव्याची हद्द सोडून हत्ती सिंधुदुर्गात गेला होता. आताही तसेच झाले आहे. यामुळे हत्तीला जेरबंद करण्याची वेळ आली नाही. त्याला पिटाळण्याचे प्रयत्न सुरू असताना बुधवारी ओंकार सिंधुदुर्गात गेला.
पूर्वीप्रमाणेच त्याचा यावेळीही गोव्याच्या हद्दीतील मुक्काम वाढला होता. ओंकार पुन्हा गोव्याच्या हद्दीत येऊ नये, म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी.
सिंधुदुर्गात जो हत्तींचा कळप आहे, त्या कळपापासून ओंकार हत्ती विभक्त झाला आहे. मूळ कळपातील इतर हत्ती त्याला कळपात थारा देत नाहीत, यामुळे तो सैरभैर झालेला आहे. आता त्याला गोव्याच्या हद्दीची ओळख तसेच सवय झाली आहे. यामुळे भविष्यात तो पुन्हा पुन्हा गोव्याच्या हद्दीत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
जेवढे अधिकार असतात व जेवढ्या साधनसुविधा असतात, त्याचाच वापर करणे प्रशासनाच्या हातात असते. साधनसुविधा वाढविणे व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असते. यामुळे मुख्यमंत्री वा वन मंत्र्यांनी आताच ओंकार हत्तीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहायला हवे. हत्तीला जेरबंद करून त्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा विचार व्हायला हवा. यासाठी इतर राज्यांची मदत घ्यायला हवी. गरज पडल्यास केंद्र सरकारपर्यंत हा विषय पोचवायला हवा. हत्तीमुळे बागायतीचे नुकसान सोडाच जीवितहानी सुद्धा होण्याचा धोका असतो. हत्तीमुळे परिसरातील मुले शाळेत जाण्यास घाबरत होती. यामुळे संबंधित राज्यांनी ओंकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा विचार गांभीर्याने करायला हवा.
- गणेश जावडेकर