गेल्या काही वर्षांत राज्यात रस्ते अपघातात वन्य प्राण्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी कोने - प्रियोळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ब्लॅक पँथरचा मृत्यू झाला होता. पर्यावरणप्रेमींच्या अंदाजनुसार वर्षाला सुमारे दोन हजार वन्यजीवांचा अपघाती मृत्यू होतो. यामध्ये पक्षी, साप व अन्य लहान मोठ्या वन्यजीवांचा समावेश आहे. याचाच अर्थ मानवाच्या निष्काळजपणामुळे महिन्याला १६६ तर दिवसाला ५ वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. असे असले तरी याबाबत अद्यापही सरकारने कोणतेही अधिकृत सर्वेक्षण केलेले नाही.
वन्य प्राण्यांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी सरकारसह सामान्य नागरिकांनी देखील जागरूक राहणे आवश्यक आहे. रस्ता चांगला आहे, रहदारी नाही म्हणून सुसाट गाडी चालवणे हे देखील चुकीचेच आहे. रस्त्यावर प्राणी येत असतात किंवा येऊ शकतात याची माहिती वाहन चालकांना दिली पाहिजे. चालकांना वाहन परवाना देतानाच याबाबतची माहिती देता येऊ शकते. याविषयी शाळा, महाविद्यालयात जागृती केल्यास वन्य प्राण्याचा तसेच वाहन चालकाचा देखील जीव देखील वाचू शकतो. सरकारने याबाबत पुढाकार घेऊन असा उपक्रम सुरू
करावा.
अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी गुपचूप प्लास्टिकच्या पिशवीत कचरा भरून रस्त्यावर टाकला जातो. अशा कचऱ्याच्या वासामुळे देखील प्राणी रस्त्यांवर येत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे असा कचरा टाकणे बंद झाल्यास अपघातांच्या घटना कमी होऊ शकतात. यासाठी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम सुरू केली पाहिजे.
वन्य क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गांवर प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी विशेष पूल, बोगदा तयार किंवा कॉरिडॉर करणे आवश्यक आहे. देशातील अन्य काही राज्यात असे पूल बांधणे सुरू झाले आहे. गोव्यात वन्यजीवांची संख्या खूप असल्याने येथेही असे पूल बांधणे आवश्यक आहे. आपघात झाल्यास प्राण्यांसाठीची वैद्यकीय सुविधाही वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. याबाबत वन खात्याने नुकतीच बैठक घेऊन प्राण्यांसाठी विशेष कॉरिडॉर, रिस्पॉन्स टीम आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा आधी सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र या उपायोजना केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली जंगल, डोंगर, नद्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे. हे जीव मनुष्य वस्तीत दिसल्यास त्यांचे व्हिडिओ काढून शेअर केले जातात. वन्य प्राणी मनुष्यवस्थीत घुसला असे सांगण्यात येते. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षांत मानवानेच त्यांच्या भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पुढील काळात मनुष्य आणि वन्यप्राणी हा संघर्ष आणखीन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आता शांत राहिलो तर भविष्यातील पिढी नक्कीच आपल्याला दोषी ठरवणार आहे. त्यामुळे या गोष्टी आपण तोंडावर पट्टी लावून गपचूप पाहत बसायाच्या की यावर भूमिका घ्यायची याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.
पिनाक कल्लोळी