मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि खुद्द पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करण्याची जी कारवाई केली ती प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच आहे.
केवळ लष्करी कारवाई अथवा दारूगोळा आणि बॉम्बचा वर्षाव म्हणजे युद्ध नव्हे, तर पाणी हे सुद्धा अस्त्र बनू शकते हे भारताने पाकिस्तानला दाखवून दिले, हे मान्य करतानाच, भारत कधी आक्रमण करणार आहे, असे प्रश्न जिकडेतिकडे विचारले जात होते. विरोधी पक्षांनी तर अविवेकी आणि बेताल वक्तव्ये करायला सुरवात केली होती. अशा स्थितीत बुधवारी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर व खुद्द पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे प्रमुख अड्डे नष्ट केल्याची सुवार्ता मिळाली. सरकार ठोस पावले उचलत नाही, या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने दिलेले हे सडेतोड उत्तर आहे. ऑपरेशन सिंदुर नावाने झालेली ही मोहीम ज्यांनी आपल्या घरची कर्ती माणसे पहलगाममध्ये गमावली, त्यांना दिलासा देणारी ठरली आहे. खरे तर सर्वच भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. लोकवस्ती अथवा लष्करी तळ यांना लक्ष्य न करता, थेट दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करणे यात गुप्तचर यंत्रणेचा मोठा वाटा आहे. सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कामगिरी सरस ठरली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि तिन्ही दलाचे प्रमुख यांनी ज्या निर्धाराने ही मोहीम यशस्वी केली, त्याचे कौतुक करावेच लागेल.
पाणीबंदीसंबंधी मानवतावादाची ढाल पुढे काढणारे नेते आणि देश अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचे आणि दहशतवादी कारवायांचे समर्थन करीत असल्याचे जनतेला पटू लागले आहे. युद्ध न छेडता त्या देशाला वठणीवर आणण्याकडे मोदी सरकारचा कल दिसतो आहे. सुरक्षा समितीच्या बैठकीत संघर्ष टाळण्याचा सल्ला देण्यात आला, त्यामुळे आमचा इरादा सफल झाला असे पाकिस्तानच्या राजदूतांनी म्हटले खरे, पण त्यात त्या देशाची हतबलता उघड झाली. पाणी म्हणजे जीवन, अस्त्र नव्हे असे म्हणताना हे राजदूत म्हणतात की, १९६० चा सिंधू जल करार स्थगित करून आमच्या २४ कोटी लोकांचे तोंडचे पाणी पळवले. ही पाणी बंदी त्या देशाला कशी झोंबली आहे, हे त्यावरून स्पष्ट होते. पाकिस्तानचे ९० टक्के कृषी क्षेत्र सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. ही नदी केवळ शेतीलाच आधार देत नाही तर प्रमुख शहरांना पिण्याचे पाणी पुरवते आणि ऊर्जा (जलविद्युतद्वारे) आणि उद्योग यासारख्या प्रमुख क्षेत्रांना टिकवून ठेवते. पाकिस्तानच्या जीडीपीमध्ये शेतीचा वाटा २० टक्के आहे आणि ३५ टक्क्यांहून अधिक मनुष्यबळ रोजगार देते. सिंचनाच्या प्रवाहात व्यत्यय आल्यास ग्रामीण उपजीविका आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा या दोन्हींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय, पाकिस्तानची पाणी साठवणुकीची पायाभूत सुविधा भक्कम नाही. जलाशयांची मर्यादित क्षमता आणि हंगामी प्रवाहावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने देशात दुसरा पर्याय उपलब्ध नाही. भारताने चिनाब आणि पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या इतर नद्यांच्या प्रवाहावर निर्बंध घातले असताना, इस्लामाबादच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाने सोमवारी भारताच्या मर्यादित पुरवठ्यामुळे मराला बॅरेजवरील चिनाबची आवक अचानक कमी झाल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. भारताने पश्चिमेकडून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांवर नियंत्रण अधिक कडक केल्यास आणि सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास खरीप हंगामात पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील बगलिहार आणि सलाल जलविद्युत प्रकल्प हिवाळ्यात पाकिस्तानात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी भारत तातडीने तयारी करत आहे. यामध्ये जलाशयातील मर्यादित फ्लशिंग आणि गाळ काढण्याचा समावेश आहे. आगामी काळात भारताची अंतर्गत पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी इतर धरणांमध्येही अशीच प्रक्रिया राबविली जाणार आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार स्थगित झाल्यानंतर सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचा पाकिस्तानकडे होणारा प्रवाह रोखण्याच्या व्यापक योजनेचा हा एक भाग आहे.
भारत-पाकिस्तामधील संबंधात कमालीचा तणाव निर्माण करण्यास पहलगामधील दहशतवाद्यांनी घेतलेले २६ बळी हे जसे कारण आहे, त्याचप्रमाणे त्या घटनेनंतर पाकिस्तानने वेळोवेळी केलेली उलटसुलट वक्तव्ये आणि क्षेपणास्त्रांच्या चाचण्या या कारणांनीही जगाचे लक्ष वेधले गेले आहे. यामुळेच दोन महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जात आहेत. भारत चढाई करील का, या प्रश्नापेक्षा सध्या पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात कसा तोंडघशी पडला आहे आणि भारताने पाणी रोखल्यावर त्याचे काय परिणाम दिसू लागले आहेत, याबद्दल लष्करी तज्ज्ञ आणि विश्लेषक आपली मते व्यक्त करीत आहेत. तो देश कितीही सारवासारव करीत असला तरी दोन्ही बाबतीत पाकिस्तानची कोंडी झाल्याचे दिसते आहे. दुसरीकडे बलुचिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा उपद्रव वाढल्याने पाकिस्तान त्रस्त झाल्याचे चित्र समोर येत आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीत काय घडले याची माहिती उपलब्ध झाली आहे, त्यानुसार सदस्यांनी पाकिस्तानची हेराफेरी आणि सारवासारव स्वीकारण्यास नकार दिला आणि लष्कर-ए-तोयबाचा यात सहभाग असण्याची शक्यता आहे का, अशी विचारणा केली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा व्यापक निषेध करण्यात आला. तसेच
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबतच्या तणावावर बंद दाराआड झालेल्या चर्चेत पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांकडून कडक प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या अण्वस्त्र हल्ला करण्याच्या वक्तव्याबद्दल दोष दिला. असे असले आणि दहशतवादाबाबत भारताची चिंता योग्य असल्याचे मत व्यक्त केले जात असले तरी संपूर्ण दोष पाकिस्तानवर टाकण्यास ते तयार नाहीत, हे सध्याच्या भारतावरील संकटाने उघड केले आहे. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर पाकिस्तानही दहशतवादाचा बळी ठरल्याचे मानले जाते, मात्र हा भस्मासुर त्या देशानेच पोसला आहे, हे नाकारता येणार
नाही.
गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४