हुथींना इस्रायलचे जशास तसे उत्तर

Story: विश्वरंग |
06th May, 09:59 pm
हुथींना इस्रायलचे जशास तसे उत्तर

इस्रायलने येमेनच्या हुथी बंडखोरांवर सोमवारी (५ मे) हवाई हल्ले केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने येमेनेच्या लाल समुद्रातील होदेदा बंदराला लक्ष्य करत सहा बॉम्ब हल्ले केले. तर इतर काही हल्ले होदेदा प्रांताच्या इतर प्रदेशांतील सिमेंट कारखान्यांवर केले आहेत. दोन दिवसांपूर्वी इराण समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या प्रमुख बेन गुरियन या विमानतळावर क्षेपणास्त्रे डागली होती. यामध्ये सहाजण जखमी झाले होते. या हल्ल्यामुळे विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीने सुरक्षा मंत्रालयाची बैठक बोलवत हुथींना या हल्ल्याचे लवकरच योग्य उत्तर देण्यात येईल असे म्हटले होते.      

हुथी हा येमेनमध्ये सक्रिय असलेल्या बंडखोरांच एक गट आहे. यांना इराणचा पाठिंबा आहे. सद्यस्थितीत त्यांनी येमेनच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले असून ते ‘रेड सी’ म्हणजेच तांबडा समुद्रातून इस्रायलला जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत आहेत. हुथी बंडखोर हे शिया पंथाचे असून त्यांनी येमेनच्या सरकारविरुद्ध बंडखोरी सुरू केली आहे. हुथी स्वतःला हमास आणि हिजबुल्लाहच्या साथीने इस्रायल, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या विरोधात इराणच्या नेतृत्वातील विरोधी अक्ष गटाचा भाग मानतात.      

हुथी बंडखोर लेबनानच्या सशस्त्र शिया समूह हिजबुल्लाहच्या मॉडेलकडून प्रेरणा घेतात. अमेरिकेतील रिसर्च इन्स्टिट्यूट ‘कॉम्बॅटिंग टेररिझम सेंटर’ नुसार हिजबुल्लाहद्वारेच त्यांना २०१४ पासून मोठ्या प्रमाणावर लष्करी मदत आणि प्रशिक्षण दिले जात आहे. इराण हुती बंडखोरांना शस्त्र देत असल्याची शंकाही व्यक्त केली जाते. अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या मते, इराणने हुथी बंडखोरांना बॅलेस्टिक मिसाइल पुरवली होती. त्याचा वापर २०१७ मध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियादवर हल्ल्यासाठी करण्यात आला होता.       

मागील वर्षी अमेरिका आणि ब्रिटनने संयुक्तपणे येमेनमधील हुथी बंडखोरांच्या तळांवर मोठा हल्ला केला होता. येमेनची राजधानी साना येथील हुथी तळांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले होते.  हुथी दहशतवादी हे मालवाहू जहाजांवर हल्ले करत असून येमेनला दिली जाणारी मदत ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळेच अमेरिकेने त्यांच्यावर हल्ला केला होता. ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्याशिवाय ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड आणि न्यूझीलंडच्या सैन्यानेही हा संयुक्त हल्ला केला होता.   

- गणेशप्रसाद गोगटे