भीती म्हणजे काय, भीतीवर कशी मात करावी?

एकदा का भ्रम निघून गेला, की मग भीती उरतेच कुठे? जे अस्तित्वात नाही त्याची कल्पना तुम्ही करणार नाही, सध्या जे अस्तित्वात आहे तुम्ही त्यालाच प्रतिसाद द्याल.

Story: विचारचक्र |
11th May, 08:02 pm
भीती म्हणजे काय, भीतीवर कशी मात करावी?

सद्गुरू : भीती निर्माण होते कारण तुम्ही जीवनासोबत जगत नाही, तर मनात जगत असता. तुमची भीती नेहमी पुढे काय होणार याबद्दल असते. याचा अर्थ तुमची भीती नेहमी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल असते. जर तुमची भीती अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल असेल, तर ती शंभर टक्के काल्पनिक आहे. जर तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींमुळे दुःख भोगत असाल, तर आम्ही त्याला वेडेपणा म्हणतो. लोक कदाचित समाजाने स्वीकारलेल्या वेडेपणाच्या पातळीनुसार असू शकतात, परंतु जर तुम्ही भीत असाल किंवा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींमुळे दुःख भोगत असाल, तर ते वेडेपणाचे लक्षण आहे, नाही का?

लोक नेहमी काल काय झाले किंवा उद्या काय होईल याचे दुःख भोगतात. म्हणजेच तुमचे दुःख नेहमी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबद्दल असते, याचे कारण म्हणजे तुमची मुळे वास्तवात रुजलेली नाहीत, तर ती तुमच्या मनात रुजलेली आहेत. मन म्हणजे - एक भाग स्मृती आहे, दुसरा भाग कल्पना आहे. दोन्ही एका प्रकारे कल्पनाच आहेत, कारण दोन्ही सध्या अस्तित्वात नाहीत. तुम्ही तुमच्या कल्पनेत हरवून गेलेले आहात, हाच तुमच्या भीतीचा पाया आहे. तुम्ही जर वास्तवात रुजलेले असाल, तर भीती नसेल.

जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले, तर भीती कशाबद्दल आहे? तुमची भीती कधीच घडून गेलेल्या गोष्टींबद्दल नसते. ती नेहमी काय होऊ शकते याबद्दल असते. ती नेहमी भविष्याबद्दल असते. भविष्य अजून घडून यायचे आहे. ते अजून घडलेले नाही. म्हणजे, ते अस्तित्वात नाही. म्हणजेच, भीती असणे म्हणजे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींमुळे दुःख भोगणे. जर तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींमुळे दुःख भोगत असाल, तर आम्ही तुम्हाला शहाणे म्हणायचे की वेडे? तुमचे एकमेव समाधान हे आहे की "सगळे माझ्यासारखेच आहेत." तुमच्यासोबत बहुसंख्य लोक आहेत! पण तरीही ते योग्य ठरत नाही, कारण तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टींमुळे दुःख भोगत आहात.

भीतीचे मूळ

तुमच्यात भीती निर्माण होण्याचे मूलभूत कारण म्हणजे - एक दृष्टिकोन असा आहे की - या प्रचंड विश्वात, ज्याची सुरुवात किंवा शेवट तुम्हाला माहीत नाही, तुम्ही एक लहानसे मानव प्राणी आहात. आता तुम्ही जे इतके लहान अस्तित्व आहात, त्यामुळे स्वाभाविकपणे स्वतःसोबत काय होईल याबद्दल भीती आणि असुरक्षितता वाटत राहते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला केवळ शरीर म्हणून ओळखता, जोपर्यंत तुमचा जीवनाचा अनुभव तुमच्या शारीरिक आणि मानसिक गोष्टींपुरता मर्यादित आहे, तोपर्यंत भीती आणि असुरक्षितता अटळ आहे. विविध लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेच्या विविध पातळ्या असू शकतात. आज, जर तुमचे जीवन चांगले चालले असेल, तर तुम्ही तुमची असुरक्षितता विसरून जाल. उद्या, जर तुमचे जीवन उलटे-पालटे झाले, तर तुम्हाला भीतीची आठवण येईल, कारण ती नेहमीच तुमच्या आत असते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला शरीराच्या आणि मनाच्या मर्यादांपलीकडे अनुभवायला सुरुवात करते, फक्त तेव्हाच ती व्यक्ती असुरक्षितता आणि भीतीपासून मुक्त होऊ शकते.

शारीरिकतेपलीकडे स्वतःला अनुभवणे यालाच आम्ही अध्यात्मिक म्हणतो. जेव्हा मी अध्यात्मिक म्हणतो, तेव्हा हे मंदिरात जाण्याबद्दल आहे असा विचार करू नका. जर तुम्ही तुमच्या प्रार्थनांकडे पाहिले, तर त्यापैकी ९५ टक्के एकतर संरक्षणाबद्दल किंवा काळजी घेण्याबद्दल विनंती करणे आहे. त्यात काही अध्यात्मिक नाही. ते साधे, मूलभूत जगणे आहे. बहुतेक लोकांच्या बाबतीत प्रार्थनेचा मूळ पाया भीती आणि असुरक्षितता आहे. जर प्रार्थना तुमच्या जीवनात फक्त एक कृती म्हणून असेल, तर ती अयोग्य आहे. जर तुम्ही प्रार्थनामय झालात, तर ते अद्भुत आहे आणि जर तुम्ही त्या गुणवत्तेकडे जाण्यासाठी प्रार्थनेची कृती वापरत असाल, तर ते ठीक आहे. पण जर तुम्ही तुमचे जगणे स्वर्गाचा आधार घेऊन घालवत असाल, तर ते अतिशय मूर्खपणाचे आहे. अगदी कृमी आणि कीटक देखील स्वतःच्या जगण्याची काळजी घेतात.

जेव्हा मी अध्यात्मिक म्हणतो, तेव्हा मी तुम्हाला भौतिक नसलेल्या गोष्टींचा अनुभव घेण्याची सुरुवात करण्याबद्दल सांगतो आहे. एकदा का हा अध्यात्मिक आयाम जिवंत झाला, एकदा का तुम्ही स्वतःला शारीरिक आणि मानसिक मर्यादांपलीकडे अनुभवायला सुरुवात केली, की तेव्हा भीती सारखी कोणतीही गोष्ट उरत नाही. भीती ही फक्त अति सक्रिय आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या मनाची निर्मिती आहे.

भीतीवर कशी मात करावी

भीती ही जीवनाची निर्मिती नाही. भीती ही भ्रामक मनाची निर्मिती आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टींमुळे तुम्ही त्रास सोसता कारण तुम्ही वास्तवात नाही, तर तुमच्या मनात गुंतलेले आहात, जे भूतकाळाचे चर्वण करत राहते आणि तेच भविष्यात बाहेर काढत राहते. तुम्हाला भविष्याबद्दल खरोखर काहीच माहीत नसते. तुम्ही फक्त भूतकाळाचा एक तुकडा घेता, त्यावर साज-सजावट करता आणि असा विचार करता, की ते भविष्य आहे.

तुम्ही तुमच्या उद्याचे नियोजन करू शकता, परंतु तुम्ही उद्यात जगू शकत नाही. पण सध्या लोक उद्यात जगत आहेत आणि म्हणूनच भीती आहे. याबाबत तुम्ही एकच गोष्ट करू शकता, वास्तवात येणे. जर तुम्ही आत्ता सध्या असलेल्या गोष्टीला प्रतिसाद दिलात आणि जे अस्तित्वात नाही त्याबद्दल कल्पना केली नाही, तर भीतीला जागाच नसेल. एकदा का भ्रम निघून गेला, की मग भीती उरतेच कुठे? जे अस्तित्वात नाही त्याची कल्पना तुम्ही करणार नाही, सध्या जे अस्तित्वात आहे तुम्ही त्यालाच प्रतिसाद द्याल.

कृपया याकडे लक्षपूर्वक पहा, शेवटी वाईटात वाईट काय घडू शकेल? जास्तीत जास्त तुम्ही मराल, त्यापेक्षा जास्त काही नाही. निदान मरण्यापूर्वी जगा, कारण तसेही तुम्ही मरणारच आहात. आपण तशी ईच्छा करणार नाही. आपण अनेक वर्षे जगण्याची योजना आखत असतो, पण तरीही मरण येऊ शकते, नाही का? जीवनाबद्दल खरोखर कोणतीच सुरक्षितता नाही. हा प्रश्न फक्त एवढाच आहे, की तुम्ही या जीवनात किती सुंदरपणे आणि स्वतंत्रपणे  जगलात. जर तुम्ही जगला असाल, तर मरण सार्थक ठरेल. अन्यथा जीवन पश्चात्ताप असेल, मृत्यू पश्चात्ताप असेल.


- सद् गुरू

(ईशा फाऊंडेशन)