सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याच्या अंदाधुंद गोळीबारात अनेक रहिवाशांनी प्राण गमावले आहेत, मालमत्ता नष्ट झाली आहे. अशा स्थितीत भारताने एक पाऊलही मागे न येता पाकिस्तानवर चढाई जारी ठेवावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
भारत-पाकिस्तान देशांमधील युद्ध तूर्त थांबले आहे, आपण प्रदीर्घ चर्चा करून दोन्ही देशांना पटविले आहे की, युद्धाने काहीही साध्य होणार नाही. अतिरेक्यांना नामशेष करण्याचा लढा यापुढेही सुरू राहील, अशा आशयाचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन बरेच काही सांगून जाते. युद्ध का थांबले, पाकिस्तानला का दिलासा दिला, अशी माघार का घेतली असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशाप्रति असलेल्या सरकारच्या जबाबदारीचे विस्मरण झालेले दिसते. नागरिकांची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था यांना प्राधान्य देत भारताने शस्त्रबंदीला होकार दिला असला तरी आपले लष्कर आजही सीमेवर आणि लष्करी तळांवर, हवाई तळांवर सज्ज आहे, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशातील कोट्यवधी जनतेच्या रक्षणासाठी सीमेवर बलिदानाची तयारी ठेवून लढणाऱ्या जवानांची, अधिकाऱ्यांची तसेच हवाई दल आणि नाविक दल यांच्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांच्या प्राणाचे मोल आपण विसरू शकत नाही. पाकिस्तानची कोंडी कशा प्रकारे झाली, तेथील लष्करी तळ आपल्या लढाऊ विमानांनी आणि क्षेपणास्त्रांनी कसे निकामी केले, याचे वृत्त आपण वाचतो, पाहतो. त्याचवेळी पाकिस्तानसारख्या अविवेकी आणि आततायी देशाच्या कारवाया, गोळीबार, हल्ले थोपवण्यासाठी भारतीय लष्कर कधीच मागे राहिले नाही आणि आताही तयारीत राहिले आहे, याकडे काही जण दुर्लक्ष करतात. देशाच्या अंतर्गत भागांत, उत्तरेतील काही राज्यांत, दक्षिणेतील बहुतेक राज्यांत पाकिस्तानी हल्ल्यांची तीव्रता जाणवत नसली तरी सीमावर्ती भागांत पाकिस्तानी सैन्याच्या अंदाधुंद गोळीबारात, ड्रोनच्या वापराने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांना थेट लक्ष्य केले जात आहे, अनेकांनी प्राण गमावले, मालमत्ता नष्ट झाली आहे. अशा स्थितीत भारताने एक पाऊलही मागे न येता पाकिस्तानवर चढाई जारी ठेवावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे कथित विचारवंत आणि राजकीय विश्लेषक मान्य करीत नाहीत, हे चिंताजनक आहे.
पहलगाममधील पर्यटकांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांना पकडणे, त्यांचे अड्डे नष्ट करणे आणि दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरू ठेवणे हेच भारताचे उद्दिष्ट होते. देशात मॉकड्रिलचा सराव करण्यासाठी जो दिवस ठरला, त्यावेळी अशा सरावानंतरच भारतातर्फे चढाई होण्याची शक्यता पाकिस्तानला वाटत होती, तथापि बेसावध पाकिस्तानवर विशेषतः अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रे डागली गेली, ते अड्डे नष्ट करण्यात आले, हे पहिले यश मानावे लागेल. भारताच्या या हल्ल्यात अनेक कुप्रसिद्ध अतिरेकी ठार झाले, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. अशा स्थितीत अमेरिका, रशिया, चीन अथवा मुस्लिम देश हस्तक्षेप करतील असा कयास होता, तथापि आपला लढा हा कोणत्याही देशाच्या जनतेविरोधात नाही, लष्कराशी नाही तर अतिरेक्यांशी आहे, हे भारताने सर्वच देशांना ठणकावून सांगितले आणि त्यांना या घडामोडींपासून सुरक्षित अंतरावर ठेवले हे मुत्सद्देगिरीचे महत्त्वाचे पाऊल होते. तुर्कस्थानचा अपवाद सोडला तर अन्य देशांनी सक्रियपणे पाकिस्तानला मदत केली नाही, हे तर दिसतेच आहे. ज्या परिस्थितीत पाकिस्तानची हवाई शक्ती निकामी झाली, त्या देशातील हवाई दलाला हतबल व्हावे लागले, त्याचवेळी तो देश अन्य देशांशी सपर्क साधू लागला आणि त्यातून पुढे आला तो तूर्त संघर्ष टाळण्याचा तोडगा. भारताने जशास तसे उत्तर दिल्याने अतिरेकी संघटना आणि पाकिस्तान सरकारला दणका बसला, हे त्यांच्या पंतप्रधानांच्या निवेदनातून स्पष्ट झाले आहे. भारताने कधीही विस्तारवादाला प्राधान्य दिलेले नाही, त्यामुळे लढाई पुढे सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे सरकारला वाटले नसेल.
कोणत्याही युद्धाचे परिणाम हे वाईटच असतात. मनुष्यहानी होणे हा तर महत्त्वाचा घटक. त्यामुळे युद्धविराम स्वीकारणे योग्यच होते, असे सुज्ञ भारतीय नागरिक म्हणेल. कोणताही प्रदेश पादाक्रांत करण्याचा उद्देश भारतीय सेनेचा नव्हता, हे तर स्पष्टच होते. भविष्यातही पाकिस्तान दहशतवाद्यांच्या माध्यमातून हल्ला करणार नाही, याची शाश्वती कोणताही देश देऊ शकत नाही. त्यामुळे भारताला सतत सावधगिरी बाळगावी लागेल. त्या देशाने कुरापती काढण्याचे थांबवलेले नाही. दोन-तीन दिवसांत युद्धविराम का स्वीकारला असे प्रश्न विचारून देशाने यात काय कमावले, असा मुद्दा पुढे आणला जात आहे. दोष सरकारला द्यायची ही संधी मानली जात आहे. तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांनी स्वीकारलेला सध्याचा तोडगा हा विचारांती घेतलेला निर्णय असेल. पाणीबंदी अथवा जशास तसे उत्तर देण्यात आपण मागे राहणार नाही, याची ग्वाही गेल्या तीन-चार दिवसांत जनतेला मिळाली आहे.