चोर्ला गावाचा समृद्ध वारसा

चोर्लातील जंगलवैभव, बारामाही प्रवाहित असणारे जलस्रोत विस्मृतीत जात आहेत, ही आजची खरी शोकांतिका आहे. ती थोपवण्यासाठी आत्मनिर्भर, सुसंवादी चोर्ला गावचे नियोजन ही काळाची गरज ठरलेली आहे.

Story: विचारचक्र |
14th May, 12:35 am
चोर्ला गावाचा समृद्ध वारसा

एकेकाळी चोर्ला गाव जंगलाने समृद्ध असल्याने इथे बारामाही चवदार पाण्याची मुबलक उपलब्धता जशी होती, तशी रानटी पालेभाज्या, कंदमुळे त्याचप्रमाणे उडीद, कुळीत, वरी, नाचणी, पाखड आदिंची येथे पैदासी व्हायची. त्यामुळे शेकडो वर्षांपासून हा गाव मानवी समूहाला अश्मयुगापासून आजतागायत आकर्षित करीत आहे. जंगली श्वापदांची सामूहिकरित्या शिकार करण्याची इथे परंपरा रूढ होती. जगण्यासाठी शुद्ध हवा, चवदार पाणी आणि सकस अन्न याबरोबरच मनशांती देणारे प्रसन्न वातावरण चोर्लात होते आणि त्यामुळे घाट मार्गातील हा गाव सजीव मात्रांना अधिवास पुरवत आहे. एकेकाळी  देवतत्त्व सधन जंगलात असल्याकारणाने कुमेरी शेतीच्या माध्यमातून नष्ट केल्या जाणाऱ्या वनक्षेत्राचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी रामेश्वराच्या मंदिर परिसरात देवराईचे अस्तित्व राखले होते. देवाची ही राई जैविक संपत्तीने संपन्न असल्याने गावाचे भूषण ठरली होती. देवाचे अधिष्ठान मानून देवतळीचे रक्षण केले होते. हलतरा नदीपात्रातील चवदार मासे पौष्टिक अन्नाची रसद पुरवत असल्या कारणाने त्यांचे समूह उच्चाटन होऊ नये म्हणून 'बियाची कोण' या पवित्र डोहात पूर्वपार मासेमारीला प्रतिबंध केला होता. या नदीपात्रातील 'बियाची कोण' वगळता अन्यत्र मासेमारी केली जायची आणि त्यामुळे माश्यांच्या प्रजातींची पैदासी होण्याच्या दृष्टीने अडचणी येत नव्हत्या.

चोर्ला आणि मांगेली या गावांच्या सीमेवर सडा येथे शेकडो वर्षांच्या इतिहासाची स्मृती सांगणारा किल्ला असून, आज त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. हा किल्ला आणि जुना राजवाडा यांचे अवशेष इथल्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची आठवण सांगत आहेत. पोर्तुगीज अमदानीत मोरे राणे यांच्या बंडातील नेता शंभू मोरे यांची षङयंत्र रचून बक्षिसाच्या लालसेने निर्घृणपणे हत्या केली होती. एकेकाळी सडा येथे सुमारे सत्तर विहिरी होत्या. त्यापैकी आजही जी एक पायऱ्यांनी युक्त आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाच्या शैलीचे दर्शन घडवणारी विहीर अस्तित्वात आहे, त्यावरून इथल्या समृद्धीची प्रचिती 

येते.

फाल्गुनात आम्रवृक्षाच्या खांब्याला आम्रपल्लवांनी सजवून ग्रामदेवीच्या मंदिरासमोर होळी घातल्यानंतर चोर्लातील शिमग्याच्या उत्सवाला सुरुवात व्हायची आणि अख्खा गाव घोडेमोडणी, रोमटामेळ, राधाकृष्ण नृत्य, रणमाले लोकनाट्यात रममाण व्हायचा.

कधीकाळी पत्नीच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मृतीप्रीत्यर्थ इथे ढोल-ताशांच्या निनादात करवल्यांचा संपन्न होणारा उत्सव चाकरमन्यांना गावाकडे बोलवतो. दोन पुरुष मुलांना स्त्री वेशात सजवून आणि अबोली फुलांच्या गाजऱ्यांनी अलंकृत करून मिरवणुकीत घरोघरी नेले जाते आणि सुवासिनी आपले सौभाग्य अक्षय टिकावे म्हणून करवल्यांचे पूजन करतात, त्यावेळी ढोल, ताशे आणि कासाळेच्या निनादात सोकारतीचे गायन उत्स्फूर्तरित्या करतात.

घाटी लागलो पाऊस

कोकणा गेलो लोंढे 

भिडलो रेशमी गोंडो कुळकाराचो, रामा 

असे गात रामेश्वर सातेरी माया केळबाय ब्राह्मणी आणि धाडवंशचा सोकारतीत उल्लेख केला जातो. पारंपरिक लोकगीतांची रचना शेकडो वर्षांपूर्वी केली होती. चंदनाचा लेप काढून त्याद्वारे रामेश्वराची जी पूजा केली जाते, त्याचा उल्लेख केल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी या भूमीत पंगारा, खैर, नागवेल, औदुंबर आदींची लागवड केली ते सांगितले जाते. त्यात चंदन वृक्षाचे महत्व आणि मूल्य अधिक असल्याने त्याच्या रोपाची लागवड करून तो मोठा होईपर्यंत कशी मशागत केली जायची, हे संदर्भ येतात. त्याकाळी मानवी जीवनात परिसरातल्या वृक्षवेलींचे महत्त्व उमजले होते आणि म्हणून त्याचे संगोपन मोठ्या आत्मियतेने केले जायचे.

सोकारती गीते आशयदृष्ट्या साधी सरळ असली तरी अविष्कारदृष्ट्या लयबद्धतेने समृद्ध आहेत. लयबद्ध असणारी ही गीते मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेली आहेत. स्वरलयीच्या आकर्षणाने आणि तत्संबद्ध कृतीमुळे ही गीते टिकून राहिलेली आहेत. सोकारतीची गीते लवचिक असून पारंपरिक गायन शैलीमुळे आणि सामूहिक सादरीकरणाने ती अधिक सामर्थशील झालेली आहेत. इथल्या कष्टकरी माणसांच्या परंपरा, इतिहास आणि लोकजीवनाचे चित्रण त्यातून पूर्वपार होत आलेले आहे.

कुर्ला काडी पाणी 

हलतराच्या न्हही 

मामूजी सांगे कानी जलमाची 

या, बाये गावात हसाया खेळाया... 

अशा साध्या सोप्या परंतु परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाचे वर्णन करणारी शब्दरचना अशा सोकारतीच्या लोकगीतांचे वैशिष्ट्य असून त्याद्वारे पिढ्यानपिढ्यांच्या परंपरा, श्रद्धा प्रवाहित राहिलेल्या आहेत. त्याचे दर्शन घडवण्याची कामगिरी अज्ञात लोकगीत रचनाकारांनी केलेली आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या धगधगत्या सरणावर एखादी पत्नी निर्भयपणे मृत्यूच्या आधीन झाली तर तिला सतीचे स्थान प्रदान करून, करवल्याच्या लोकगीतांच्या गायनातून समाजाने त्यांची स्मृती चोर्लासारख्या गावात टिकवून ठेवलेली आहे, त्याला कारण त्यातून प्रकर्षाने होणारी सामुदायिक जीवनाची अभिव्यक्ती, गेयता, प्राचीनता, मौखिकता आदी साहित्यिक गुणधर्मांनी युक्त लोकगीते आणि त्यांच्याशी निगडीत लोकपरंपरा इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. करवल्याच्या उत्सवामागे सतीमातेची शक्ती अदृश्य रुपात वावरत असून ती विधायक व विद्धवंसक गोष्टी घडवून आणते, त्या शक्तीची आपल्या समाजावर कृपा अखंड राहावी म्हणून अशा लोकगीतांची निर्मिती आणि लोकविधींचे प्रयोजन केलेले आहे. ही गीते संस्कारक्षम असून त्यातल्या लोकपरंपरेने कष्टकरी लोकांचे जगणे समृद्ध केले आहे. काल संवादी, सहज स्फूर्ती, पारंपरिक भावविश्व यांचा आविष्कार सोकारतीतील लोकगीतांनी चोर्लासारख्या गावात पिढ्यान-पिढ्यापासून यशस्वीपणे केला होता. आज पोटापाण्यासाठी गावाकडची पारंपरिक शेतीला निर्माण झालेल्या नाना अडचणी, नैसर्गिक आपत्ती, रानटी प्राण्यांचा उपद्रव, यामुळे ती टाकून चोर्ल सारख्या गावातील मंडळी शहरी भागात स्थायिक होत असल्याने त्यांचे आणि तरुण पिढीचे भावविश्व यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक निर्माण झालेला आहे. त्यामुळे चोर्लातील जंगल वैभव, बारामाही प्रवाहित असणारे जलस्रोत विस्मृतीत जात आहेत, ही आजची खरी शोकांतिका आहे. ती थोपवण्यासाठी आत्मनिर्भर सुसंवादी चोर्ला गावचे नियोजन ही काळाची गरज ठरलेली आहे.


- प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५