प श्चिम बंगालच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश जारी केला आहे. आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी शाळांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या १९ पुस्तकांची खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
शालेय शिक्षण आयुक्तांनी जिल्हा शैक्षणिक निरीक्षकांना याबाबत सूचना दिली आहे. प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात एकूण ५१५ पुस्तके असावीत, ज्यामध्ये ममता बॅनर्जींच्या १९ पुस्तकांचा समावेश आवश्यक आहे. या निर्णयावर भाजप आयटी सेलचे प्रमुख व पश्चिम बंगालचे केंद्रीय निरीक्षक अमित मालवीय यांनी राज्य सरकारची खिल्ली उडवली आहे. ममता बॅनर्जींच्या बंगालमध्ये विद्यार्थ्यांनाही भ्रष्टाचारातून सूट नाही. सरकारी शाळांना १ लाख रुपयांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेली १९ पुस्तके विकत घ्यायला भाग पाडले जात आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. राज्य सरकार फसव्या पुस्तकांच्या विक्रीमार्फत आणि मागच्या दाराने रॉयल्टी मिळवून तृणमूल काँग्रेसचा खजिना भरत आहे, असे त्यांनी
म्हटले आहे.
राज्यातील विविध शिक्षक संघटनांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. ‘शिक्षक शिक्षकर्मी शिक्षणनुरागी ऐक्य मंच’ या संघटनेचे महासचिव किंकर अधिकारी यांनी याला विरोध केला आहे. शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिलेला हा आदेश तत्काळ मागे घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
अलीकडेच वृत्त आले होते की काही शाळांकडे फळा, खडू, डस्टरसाठीसुद्धा पैसे नाहीत. अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या पुस्तकांची जबरदस्तीने खरेदी म्हणजे करदात्यांच्या पैशांची लूट आहे.
या पुस्तकांचे पान फाडून विमान बनवायला उपयोग होईल, एवढाच त्यांचा उपयोग आहे. त्यांना लेखक व्हायची हौस असेल, तर त्यांनी बाजारात पुस्तके विकावीत, अशी टीका त्यांच्यावर राज्यातून होत आहे.
सरकार शाळांना पुस्तके खरेदी करण्यास भाग पाडू शकते का?, मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. मात्र, शिक्षक, राजकीय पक्ष आणि नागरिकांमध्ये या निर्णयामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय वाद जसजसा तीव्र होत आहे तसतसे शालेय ग्रंथालयांच्या स्वायत्ततेबद्दल आणि पुस्तक निवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या निर्णयामुळे पश्चिम बंगालमध्ये शिक्षण, राजकारण आणि सार्वजनिक निधी यांच्याबाबबत व्यापक वादविवाद सुरू
झाला आहे.
- प्रसन्ना कोचरेकर