कतार देणार ट्रम्प यांना सर्वात महागडे गिफ्ट !

Story: विश्वरंग |
17 hours ago
कतार देणार ट्रम्प यांना सर्वात महागडे गिफ्ट !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १४ मे रोजी कतार दौऱ्यावर जाणार आहेत. येथे कतार सरकार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना बोईंग ७४७-८ हे आलिशान विमान भेट दिले जाणार आहे, अशी चर्चा आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना मिळालेली ही सर्वात महागडी भेट ठरणार आहे. या आलिशान विमानाची किंमत ४०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ३,४०० कोटी रुपये आहे. ट्रम्प यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली. 

कतार सरकारच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, या करारावर सध्या फक्त विचार केला जात आहे. ट्रम्प कतारला आल्यावर या भेटीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते, असे मानले जात आहे.

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा मंजुरी मिळेपर्यंत ट्रम्प या विमानात बसू शकत नाहीत. यासाठी वेळ लागू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२९ मध्ये संपेल. त्याआधी ते या विमानाचा वापर करू शकतील. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपल्यावर हे विमान त्यांच्या प्रेसिडेंशियल लायब्ररीला दिले जाईल. ट्रम्प नंतरही या जेटचा वापर करू शकतात.

बोईंग ७४७-८ हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान असून ते जगातील सर्वात लांबीचे प्रवासी विमान आहे. या विमानाची लांबी सुमारे ७६.३ मीटर आहे. या विमानात दोन डेक आहेत. वरचा डेक सामान्यतः व्हीव्हीआयपी बैठका, खासगी सूट आणि कार्यालयीन जागेसाठी आहे, तर खालचा डेक बसण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी आहे. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या विमानात अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि एव्हीओनिक्स प्रणाली आहेत. याशिवाय, यात एअर मिड रिफ्युएलिंग आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली जोडण्याची क्षमता देखील आहे. बोईंग ७४७-८ एकदा इंधन भरल्यानंतर १५,००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर उड्डाण करू शकते. या बोईंग ७४७-८ चा वेग ताशी १०५३ किमी आहे. या आलिशान विमानातील व्हीव्हीआयपी इंटिरियर हे सोने-प्लेटेड फिटिंग्ज, कस्टमाइज्ड फर्निचर, आलिशान बेडरूम आणि कॉन्फरन्स रूम आहेत.

आलिशान विमान बोईंग ७४७-८ डोनाल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून मिळाल्यास ते अपग्रेड केले जाईल. या विमानात विशेषतः लष्करी दर्जाची कम्युनिकेशन प्रणाली, रडार ब्लाइंड स्पेस, जॅमिंग तंत्रज्ञान आणि आण्विक हल्ल्यातून वाचण्याची प्रणाली बसवली जाईल.

- गणेशप्रसाद गोगटे, गोवन वार्ता