ज्या आप्पाजींनी स्वच्छतेचा आग्रह धरला, त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळीच कचरा उचलला गेला नाही. कसा जाणार? अहो त्यांच्या लाडक्या साहेबाला शेवटचं भेटायला नको?
पूर्वी मुंबईत गिरगावात राहायचो. एकत्र परिवार होता आमचा. आमची इमारत तशी एका घरासारखीच होती. पूर्वी माझे सासरे, सासू, त्यांची भावंडे एकत्रच राहत. पण परिवार वाढल्यानंतर मात्र वेगळे झाले, पण जवळजवळच. रोज एकमेकांकडे येणेजाणे चालूच असायचे. अर्थात मुंबईचा रिवाजच तो. खबर घ्यायची ती घरी जाऊन, आपलेपणाने. ते मेसेज, फोन हे प्रकार नंतरचे.
घरी खूप जण येत, त्यात शनिवार रात्र, रविवार पूर्ण दिवस म्हणजे नुसता धुमाकूळ असायचा. पत्ते काय, कॅरम, पिक्चर प्रत्येक शनिवारी चालू, मग रविवार उशिरा उठून एकदा मासे आणले घरी की मग पुरुष वर्ग मोकळा. फड जमायचे गॅलरीत मग गप्पांचे. अनेक जण येत पण कसं असतं ना काही थोडेच लक्षात राहतात बघा त्यात. त्यांच्या गुणा-अवगुणाने म्हणा, सवयीने म्हणा, पण लक्षात राहतात हे खरे.
आप्पाजी हे ही त्यातलेच. गौर वर्ण, उंच देहयष्टी, रुबाबदार काचा मारलेले धोतर, वर सदरा असा वेष. गल्लीत आले की आवाजावरूनच कळे की आप्पाजी आले म्हणून. असा दणदणीत प्रकार सगळा.
आप्पाजी माझ्या सासऱ्यांचे मित्र अगदी जवळचे. महानगरपालिकेतून मोठ्या अधिकार पदावरून निवृत्त झालेले आप्पाजी म्हणजे अनुभवांची, गोष्टींची एक खाणच होती. तसे जवळच राहत ते आमच्यापासून. दर रविवारी चारच्या सुमारास हटकून फेरी असे त्यांची आमच्याकडे.
आप्पाजी येणार म्हटल्यावर घर सुद्धा फुलल्यासारखे होई आपोआप. अहो होणारच. प्रसन्न चेहरा, दणकून हसणे मोठ्या आवाजात सगळी चाळ कशी दुमदुमून जात असे. त्यात त्यांना स्वच्छतेची खूप आवड त्यामुळे ते वर येईपर्यंत झाडू-बिडू मारून आम्ही जरा साफसफाई ठेवत असू. अहो रविवारचे घर ते पसारा हा असणारच. नाही तर उगाच आप्पाजींचा बोवाळ.
आप्पाजींना आमच्या सासूबाईंनी बोवाळ्या नाव ठेवले होते, पण ते मागून आणि प्रेमाने. समोर बोलायची काय हिंमत! तर असे हे आप्पाजी घरी आले की त्यांच्यासाठी ठेवलेल्या स्पेशल सागवानी खुर्चीत बसत. पत्र्याच्या खुर्चीवर विश्वास नव्हता त्यांचा. त्यांच्या वजनाने मोडून-बिडून पडली तर? चहा घेत मग जमायचा गप्पांचा फड झोकात. विषय वेगवेगळे – राजकारण, नाटकं, सामाजिक. आप्पाजींना कुठल्याच विषयाचे वावडे नव्हते. त्यांचे अभ्यासपूर्ण बोलणे ऐकून आम्ही अचंबित व्हायचो की हे एवढे ज्ञान आणतात कुठून? अर्थात असते बाबा एखाद्यावर ईश्वरी कृपा.
गप्पिष्ट आप्पाजींना डोळे मिचकावत बोलायची छान सवय होती. विशेषतः चहा फक्कड जमला आणि एखाद्या विषयाचा क्लायमॅक्स आला की ते अजूनच डोळे मिचकावत बोलायचे. मजा येई.
महापालिकेत ते वॉर्ड ऑफिसर होते म्हणे. खूप दरारा त्यांचा! सॅनिटरी विभागात असताना त्यांनी आळशी सफाई कामगारांना आणि सुपरवायझरना वठणीवर आणले होते. पण त्याचबरोबर हाताखालील लोकांना समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे यात त्यांचा हातखंडा होता. ते आपल्या विभागात नको यासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांना आप्पाजी म्हणजे काय हे कळल्यावर जेव्हा त्यांची रीतसर बदली झाली, तेव्हा ती होऊ नये म्हणून त्यांनी परत आंदोलन केले. माझ्या मते दोन परस्परविरुद्ध कारणांसाठी कामगार झगडले असा एकमेव अधिकारी असेल पालिकेत.
असे हे आप्पाजी कामात काटेकोर आणि कमालीचे निःस्पृह होते. पगाराव्यतिरिक्त घरात अजून काही येणार नाही यावर कटाक्ष. गावी हापूस आंब्याची बाग असणारे आप्पाजी घरी मात्र क्रॉफर्ड मार्केटमधून आंबे आणत. भाऊ कसतो ना जमीन, मग फळ त्याचे अशी धारणा.
नाटके, मराठी नाट्यसंगीत म्हणजे जीव त्यांचा. त्या काळी ग्रामोफोन होता त्यांच्याकडे. मी सुद्धा पाहिलंय. अगदी गंधर्वांपासून रामदास कामतपर्यंत ओळखी त्यांच्या. बरे नाटकाला एकटे जाणे त्यांना कधी माहिती नव्हते. चार-पाच मित्र आणि पाहिजेतच. अगदी डोअरकीपरपासून मॅनेजरपर्यंत सगळ्यांचे सलाम असत.
एक तारखेला पगार झाला की आपल्या मुलांबरोबर मजल्यावरच्या सात-आठ मुलांना घेऊन ते चौपाटीवर जात. आपल्या पैशाने भेळ खायला. आणि गाड्याबरोबर नळ्याच्या यात्रेसारख्या वहिनीबाई असत. वरात फार प्रेक्षणीय असे. पण आप्पाजींना फिकीर नव्हती त्याची. कुठलीही गोष्ट करायची ठरली की मग करायची हा नेम.
वहिनीबाईंनी हे असले पंचपात्र मनापासून सांभाळले हो! आणि त्यांच्याच जीवावर तर आप्पाजींची उड्डाणे असत ना. दोघे पूरक अगदी एकमेकांना.
असे हे आप्पाजी पालिकेत मोठे अधिकारी जरूर होते पण पदाचा उपयोग आपल्यासाठी न करता सर्वसामान्यांसाठी जास्त करत. अहो ताकद असून सुद्धा आपल्या मुलांना त्यांनी जॉबला लावले नाही. मुले आपल्या जीवावर शिकली, नोकरीला लागली. अर्थात त्यांचीही कधी तक्रार नव्हती वडिलांविषयी.
नाट्यकला क्षेत्रातील अनेकांना मदत केली त्यांनी. पालिका आयुक्तांना सांगून भरपूर निधी दिला त्यांनी नाट्य कलाकारांना. पूर्वी मराठी आयुक्त असत महापालिकेत. तिनाईकर साहेब फार रसिक होते. आप्पाजींना खूप मान देत ते.
निवृत्त झाल्यानंतर आमच्याकडे नेहमी येणारे आप्पाजी अचानक वहिनीबाईंच्या जाण्यानंतर जरा अध्यात्माकडे झुकले. वहिनीबाई खरा आधारस्तंभ त्यांचा. आणि याच एका क्षेत्रात मुशाफिरी राहिली होती म्हणा, पण नंतर सतत ते याच विषयावर बोलत.
मुलेही मार्गाला लागली, नातवंडे खेळू लागली मांडीवर. आप्पाजींचे येणे आता वरचेवर होऊ लागले. पण रविवारी चार वाजले की आठवण यायची त्यांची आणि आपोआप चहाचे आधण ठेवले जाई सवयीने.
असे हे आप्पाजी वृद्धापकाळाने गेले. ते सुद्धा गडगडतच. मृगाचा पाऊस सुरू झाला, विजांचा कडकडाट आणि त्याच आवाजात छातीत चमक आली आणि गेले आप्पाजी दणक्यात देवभेटीला. नियती पण कशी असते बघा, ज्या आप्पाजींनी स्वच्छतेचा आग्रह धरला, त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळीच कचरा उचलला गेला नाही. कसा जाणार? अहो त्यांच्या लाडक्या साहेबाला शेवटचं भेटायला नको?
- रेशम जयंत झारापकर, मडगाव