दफन

लघुपट 'दफन' मधील नायकाच्या परिस्थितीतून, नोकरीसाठी 'ग्रिल सँडविच' झालेल्या माणसाच्या संघर्षाचे आणि माणुसकीच्या शर्यतीचे चिंतन करणारा लेख.

Story: आवडलेलं |
09th May, 09:46 pm
दफन

सँडविच... हे खाद्यपदार्थाचे नाव खरेतर, पण सतत एका वेगळ्या संदर्भातही ते आपल्यासमोर सातत्याने येत असते. दोघांच्या भांडणात तिसरा अडचणीच्या परिस्थितीत आला, तर त्याचे मधल्यामध्ये ‘सँडविच’ होते. दोघांच्या मध्ये जेव्हा तिसरा पिचला जातो, तेव्हाही त्याचे ‘सँडविच’ होते. मला ही उपमा खूप आवडते. दोन ब्रेडच्या स्लाइसमध्ये पिचला गेलेला टोमॅटो इथे अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर दिसतो. 

काही दिवसांपूर्वी असाच सँडविचचा विषय सुरू होता...  म्हणजे खऱ्या सँडविचचा, बरे का...  खायच्या! कुणाला कुठल्या प्रकारचे सँडविच आवडते याबद्दल बोलणे सुरू होते. तेव्हा एकजण म्हणाले की त्यांना ग्रिल सँडविच आवडते. मग त्या ग्रिल सँडविचची गाडी एका ठराविक पद्धतीच्या ग्रिल सँडविचवर घसरली. या प्रकारात म्हणे ते सँडविच तव्यावर ठेवून ग्रिल करतात. म्हणजे थोडक्यात भाजून काढतात. (इथला भाजून काढतात या वाक्प्रचाराचाही दुहेरी अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. त्याचा संदर्भ पुढे समजेलच) तर ही विशिष्ट प्रकारचे ग्रिल सँडविच करताना, तव्यावर ठेवलेल्या सँडविचला वाटीने दाब देतात. इतका ती प्रत्यक्षात ते जेव्हा भाजून तयार होते, तेव्हा ते अगदी चपटे झालेले असते. 

खरेतर हे संभाषण होऊन बरेच महिने झाले. एकदा तसे ग्रिल सँडविच करू असे एकदोनदा ठरवूनही मी विसरलेच होते. परवा एक लघुपट बघताना, लेखाच्या सुरुवातीला लिहिलेला ‘सँडविच होणे’ हा वाक्प्रचार आठवला आणि तो लघुपट पुढे पुढे बघत गेले तेव्हा अचानक हे वाटीने दाब देऊन देऊन, भाजून काढलेले सँडविच आठवले. 

कधीतरी माणूस परिस्थितीमुळे दबला जातो, पिचला जातो पण कधीतरी हे पिचणे इतक्या थराला जाते ती त्या परिस्थितीची झळ त्याला पोहोचते, तो पुरता पोळला जातो. असाच हा लघुपटाचा नट. हा इतक्या विचित्र गोष्टीत अडकलेला असतो की चटकन मनात आले, याचे नुसते ‘सँडविच’च नाही, तर चांगले वाटीने दाबून दाबून चपटे केलेले ‘ग्रिल सँडविच’ झाले आहे! नोकरी वाचवण्यासाठी त्याच्या स्वतःच्या तत्त्वांना बासनात गुंडाळून तो ठेवतो खरा, पण तो परिस्थितीच्या कचाट्यात असा काही अडकतो की सगळेच अवघड होऊन जाते. 

स्ट्रेसची जी अनेक कारणे आहेत, त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे नोकरी! नोकरी मिळेपर्यंत एकवेळ कमी स्ट्रेस असेल, पण मिळालेली नोकरी टिकवून ठेवणे, त्यासाठी वरिष्ठांची री ओढणे, आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी करणे, न पटणाऱ्या गोष्टीही पटवून घेणे या गोष्टींचा ताण अधिक असतो की काय असाही एक प्रश्न या निमित्ताने पडला. 

या लघुपटात, एका बांधकामाच्या ठिकाणी एका मजुराचा अपघात होतो. परिस्थितीतून पळ काढत वरिष्ठ अधिकारी त्यासंबंधीची सूत्रं तिथल्या कनिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवतात. वर यात आपल्या कंपनीचे नाव खराब होता कामा नये असे बजावून सांगताना त्या कनिष्ठ अधिकाऱ्याला, असे झाल्यास त्याची नोकरी जाऊ शकते असेही अगदी सहज सुनावून जातो. नोकरीचा प्रश्न आल्याने हाही गोंधळतो. अनुभव नसल्याने गडबडतो. केवळ नोकरी वाचावी या हेतूने काही चुकीची पावले उचलू बघतो. 

त्याला मुळातून काय वाटत असते किंवा लघुपटाच्या शेवटी काय होते हे बाजूला ठेवून फक्त एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करावेसे वाटले… तो म्हणजे परिस्थितीत लादत असलेले प्रेशर! हे प्रेशर या बाबतीत नोकरी संदर्भात होते पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यासाठी अनेक माणसे आपले विचार, आपल्या भावना, आपली शिकवण, तत्त्वे बाजूला ठेवतात किंवा असे म्हणू की परिस्थितीत त्यांना तसे करायला भाग पाडते. ‘माणसे चूक किंवा बरोबर नसतात, परिस्थिती चुकीची असते’ असे वाक्य कथा कादंबऱ्यांत नेहमी असते. ते वाचल्यावर दरवेळी वाटायचे की हे केलेल्या चुकीचे उगाचच स्पष्टीकरण देण्यासारखे आहे. परिस्थिती तर माणसाच्याच हातात असते ना? पण हा लघुपट बघून मात्र या नेहमी ऐकलेल्या, वाचलेल्या वाक्याचा मथितार्थ लक्षात आला. 

लघुपटात हाताळल्या जाणाऱ्या विविध विषयांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या लघुपटातही हा छान, विचार करायला लावणारा विषय मांडला आहे. आयुष्याच्या शर्यतीत तग धरून राहण्यासाठी मनाविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागतात. कितीही तत्त्वे बाळगली तरी प्रत्यक्ष आयुष्य जगताना ती पाळता येत नाही. हे कटू सत्य असले, तरी या शर्यतीत धावत राहण्यासाठी परिस्थितीच्या कचाट्यात भाजून निघण्यापेक्षा, शर्यतीतूनच काढता पाय घेणे हे व्यावहारिक दृष्टीने फायद्याचे नसलेही; पण तसे केल्याने माणुसकीच्या शर्यतीत मात्र आपण टिकून राहू हे नक्की!


- मुग्धा मणेरीकर, फोंडा